पुणे : आळंदी कोयाळीत बिबट्याचा वावर

Leopard
Leopard

आळंदी (पुणे) : खेडच्या पूर्व भागातील कोयाळी गावात दिघे भाडळे वस्तीवर मंगळवारी (ता. 23) बिबट्याने शेळीचा फडशा पाडला. उसाच्या शेतात काम करणाऱ्या आणखी दोघांवर डरकाळी फोडल्याने पूर्व पट्ट्यात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभित झाले. खेडचा पूर्व पट्टा पुणे शहराला लागून असल्याने यापूर्वी पश्चिम पट्ट्यातील असलेला बिबट्याचा उपद्रव आता पूर्व पट्ट्यात जाणवू लागला. बिबट्या हळूहळू शहरी भागाकडे वळतो की काय अशी भिती निर्माण झाली तर दुसरीकडे वन विभाग मात्र हातावर हात ठेवून असल्याचे चित्र आहे.

कोयाळी - भानोबाची (ता. खेड) परिसरात दिवसाढवळ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडू लागले आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. वनविभागातील झाडे पाण्याअभावी जळून जात असून जंगलात पाणी आणि भक्ष मिळेनासे झाले.परिणामी दिवसें - दिवस बिबट्याचा लोकवस्तीत वावर वाढू लागला आहे. भीमा नदीच्या तिरावर वसलेले छोटेशा कोयाळी गावात प्रामुख्याने  उस लागवड केली जात आहे. नव्वद टक्के शेतजमिन बागायत पट्टा आहे. उसाला पाणी द्यायचे तर आता शेतकरी दिवसाही शेतावर जाण्यास घाबरत आहेत. यापूर्वी महामार्गालगतच्या मरकळ, मोहितेवाडी, चिंचोशी, कोयाळी परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांना दिसत होता.मात्र आता बिबट्याने थेट पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याने नागरिकांमधे भीती निर्माण झाली. अनेकांना शेतामधे बिबट्या आणि दोन पिले दिसल्याचा दावा शेतक-यांनी केला.यामुळे यापूर्वी केवळ खेडच्या पश्चिम पट्ट्यात दिसणा-या बिबट्याचा वावर पूर्व पट्ट्यात वाढल्याने हळूहळू शहरी भागाकडे शिरत असल्याचे दिसून येते. कोयाळी, वढू, मरकळ, लोणीकंद, गोलेगाव ही सर्व गावे पुण्याच्या अगदी जवळच असल्याने काही दिवसांनी पुणे शहरात बिबट्याने प्रवेश केला तरी आश्चर्य वाटायला नको एवढा बिबट्या नागरी क्षेत्राकडे जाण्यासाठी सरावला आहे.

कोयाळी भानोबाची परिसरात बिबट्याने सखाराम पोकळे यांच्या  शेळीवर ताव मारला. राहुल भाडळे,आनंद दिघे व विलास दिघे यांनी अवघ्या शंभर मिटरहून बिबट्या पाहिल्याचे सांगितले.माजी सरपंच बाळासाहेब कोळेकर यांनी बिबट्याबाबत लोकांच्या मनात गोंधळ आणि भिती आहे.वनविभाग आणि पोलिस यंत्रणेने गावकऱ्यांना विश्वास देत बिबट्यापासून शेतक-यांचे संरक्षण करावे असे सांगितले.

याबाबत चाकण वनविभागाशी संपर्क साधला असता सांगण्यात आले की,बिबट्या आणि दोन पिल्लांचा वावर कोयाळी,मरकळ,गोलेगाव आणि बहुळ गावांमधे गेली तिन महिन्यांपासून आहे.तिन शेळ्यांचा फडशाही पाडला.सध्या एक शेळी जखमी आहे.मृत पशूधन मालकांना मदतनिधी देण्यात आला.सध्या बिबट्या लोकवस्तीशी एकरूप झाला.तर ऊसतोडणीसाठी परिसरात टोळ्या आल्या आहे.यामुळे लोकांना अधिक सतर्क राहून रात्रीच्यावेळी टॉर्च घेवून फिरावे.तर पशूधनचे संरक्षणासाठी शेड वापरावे.सध्या कोयाळी भागात एक पिंजरा बिबट्याच्या बंदोबस्तासाठी लावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com