कोंबड्याच्या खुराड्यातील बिबट्याने ठोकली धूम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

निरगुडसर - कोंबड्या खाण्याच्या नादात खुराड्यात घुसलेला बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक मारून खुराड्याच्या बाहेर झेप घेऊन धूम ठोकली. हा प्रकार निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे हांडेवस्तीवर गुरुवारी (ता. ५) पहाटे घडला.

निरगुडसर - कोंबड्या खाण्याच्या नादात खुराड्यात घुसलेला बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक मारून खुराड्याच्या बाहेर झेप घेऊन धूम ठोकली. हा प्रकार निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे हांडेवस्तीवर गुरुवारी (ता. ५) पहाटे घडला.

निरगुडसर जवळ असलेल्या हांडेवस्ती येथे बिबट्याने अनेक ठिकाणी हल्ले करून जनावरांना ठार मारले, या ठिकाणी दिवसाही बिबट्याचा वावर वाढला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावले. परंतु बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत होता. बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हांडे वस्तीवर राजू हांडे यांच्या गावठी कोंबड्यांच्या खुराड्याच्या दरवाजाला धडक देऊन बिबट्या आत शिरला. त्या वेळी झालेल्या आवाजामुळे राजू हांडे हे जागे झाले. त्यांनी बाहेर खुराड्याकडे येऊन पाहिले असता बिबट्या आतमध्ये कोंबड्या खात असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांतील सर्वांना याची माहिती दिली. त्या वेळी जवळ जाण्याचे कुणाचे धाडस होत नव्हते, परंतु बिबट्या कोंबड्यांवर ताव मारत असताना हळूच दरवाजाला बाहेरून पत्रे व दगड लावले. त्यामुळे जवळपास तीन तास बिबट्या त्या खुराड्यात जेरबंद होता. परंतु बिबट्या आतमध्ये अधिकच डरकाळ्या फोडू लागला. त्यानंतर बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक देऊन लावलेले पत्रे व दगड पाडून बाहेर झेप घेऊन जवळच्या शेतात पसार झाला. हे थरारनाट्य पहाटे दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत सुरू होते. या वेळी राहुल हांडे, राजू हांडे, गणेश हांडे, धीरज हांडे, महेंद्र हांडे या ठिकाणी होते. त्या वेळी माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा दूरध्वनीवरून साधलेला संपर्क अयशस्वी ठरला. परंतु पोलिसांना याची माहिती देऊन ते घटनास्थळी आले. गुरुवारी दुपारी वनविभागाचे मंचर परिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

 

Web Title: leopard in ambegaon