बिबट्याच्या हल्ल्यात आई-मुलगा जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

ओतूर - डिंगोरे (ता. जुन्नर) येथे दुचाकीवर हल्ला करून बिबट्याने दुचाकीस्वार मुलगा व त्याच्या आईला जखमी केले आहे. 

ओतूर - डिंगोरे (ता. जुन्नर) येथे दुचाकीवर हल्ला करून बिबट्याने दुचाकीस्वार मुलगा व त्याच्या आईला जखमी केले आहे. 

हा हल्ला डिंगोरे गावाच्या हद्दीत आमले शिवारात कालव्याजवळ तांबेवस्ती येथे झाला. यात मंगल विठ्ठल कुमकर (वय ५०) व त्यांचा मुलगा दिनेश विठ्ठल कुमकर (वय ३१, रा. कोळवाडी, ता. जुन्नर) हे जखमी झाले आहेत. कुमकर हे डिंगोरे परिसरातील आमले शिवारातील तांबे मळ्यात नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. परत जाता असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यात मंगल कुमकर यांना पायाला तीन ठिकाणी बिबट्याचे दात व नखे व दिनेश यालाही बिबट्याची नखे लागली.  दिनेशने प्रसंगावधान राखत गाडी न थांबवता तशीच पुढे जोरात नेली. चवताळलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीचा दोनशे मीटरपर्यंत पाठलाग केला. रात्र असल्याने दिनेशने कुठेच न थांबता थेट कोळवाडीला घर गाठले. त्यानंतर फोन करून नातेवाइकास सदर घटनेची माहिती दिली. बिबट्याचा हल्ला झाल्याचे समजताच डिंगोरे येथून समीर शेरकर, संदीप नेहेरकर, सुमीत लोहोटे हे कोळवाडीला पोचले. तोपर्यंत १०८ नंबरवर संपर्क साधून सरकारी रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनी जखमींना तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. ओतूरचे वनरक्षक विशाल अडगळे यांना माहिती देण्यात आली होती. त्यामुळे ते आधीच ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते. जखमीवर प्रथमोपचार करून त्यांना बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले.

ठोस उपाययोजनांची गरज...
जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले व माजी सदस्य बबन तांबे यांनी वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. ओतूर वन विभागाकडून मानवावर होणारे बिबट्यांचे हल्ले गांभीर्याने घेतले जात नाहीत. वन विभागाने बिबट व मानव संघर्ष टाळण्यासाठी नियमित व ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, तसेच या परिसरात पाहणी करून पिंजरा लावणे गरजेचे आहे, असे आमले व तांबे यांनी म्हटले आहे.

Web Title: Leopard attack on the mother-son