मेंढपाळाचे नशीब बलवत्तर म्हणून जीवावरचे कानावर निभावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने कानाला जोरात पंजा मारल्याने मेंढपाळाचा कान तुटला.

Leopard Attack : मेंढपाळाचे नशीब बलवत्तर म्हणून जीवावरचे कानावर निभावले

पारगाव - ता. आंबेगांव येथील ढोबळेमळ्यात आज गुरुवारी पहाटे शेतात मेंढ्यांच्या वाड्याशेजारी झोपलेल्या बाळू नाथा घुले (वय २८) (मूळ गाव - कुरुंद ता. पारनेर) या तरूण मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केला बिबट्याने कानाला जोरात पंजा मारल्याने मेंढपाळाचा कान तुटला आहे मेंढपाळाला जाग आल्याने त्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या पळाला केवळ नशीब बलवत्तर म्हणून जीवावरचे कानावर निभावले काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय मेंढपाळला आला.

येथील ढोबळेमळ्यात बाळू नाथा घुले यांनी आपला शेळ्या मेंढ्यांचा वाडा कांदे काढलेल्या शेतात लावला होता व ते पत्नीसह वाड्याच्या शेजारीच झोपले होते, शेळ्या मेंढ्यांच्या वासाने बिबट्याने अंधारात मेंढी समजूनच घुले यांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांच्या कानाला बिबट्याच्या पंजाचा जोरदार फटका बसला व घुले यांचा कान मागील बाजूस तुटला आहे, या अचानक घडलेल्या घटनेने घुले गडबडून मोठमोठ्याने ओरडायला लागले व घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी बिबट्याचा हल्ला परतवायचा प्रयत्न केला, दरम्यान आजूबाजूचे नागरिक जमा झाले, व बिबट्याला हुसकून लावण्यात यश आले.

या घटनेनंतर ३० ते ४० फुटावर असलेल्या उसाच्या शेतात बिबट्या जाऊन त्या ठिकाणी मोठमोठाल्या डरकाळ्या देत होता. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक साईमाला गित्ते व वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून घुले यांना उपलिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तिथे उपचार करून कानाला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्या असल्या कारणाने घुले यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी नेण्यात येणार असल्याचे घुले यांचे नातेवाईक बंधु टूले यांनी सांगितले. पारगाव परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच बबनराव ढोबळे व माजी उपसरपंच राजु रामदास ढोबळे यांनी केली आहे.

टॅग्स :attackLeopardShepherd