बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी (व्हिडिओ)

विवेक शिंदे
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मोटारसायकलवरून खाली पडलो असतो, तर नक्कीच बिबट्याने आम्हाला ठार केले असते. प्रसंगावधान राखून मामाने गाडी वेगात नेल्यामुळे आम्ही वाचलो. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, अशी अवस्था आमची झाली होती.
- ऐश्‍वर्या बारवे

महाळुंगे पडवळ (पुणे) : दुचाकीवरून जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बिबट्याने हल्ला केला. विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानामुळे तिने बिबट्याचा हा हल्ला परतवून लावला. शुक्रवारी (ता. 21) सकाळी सव्वासहाच्या सुमारास आंबेगाव तालुक्‍यातील चासमध्ये ही घटना घडली. बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्याची या भागातील ही दुसरी घटना आहे.

चास (ता. आंबेगाव) येथील ऐश्‍वर्या पांडुरंग बारवे (वय 17) असे संबंधित विद्यार्थिनीचे नाव आहे. चास येथील तोडकर वस्ती परिसरात भटकी कुत्री व बिबट्यांचा उपद्रव असल्याने ऐश्‍वर्याला साकोरे येथे मामा गणेश वसंत कडुसकर यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. घोडेगाव येथील विद्यालयात ती बारावीत शिक्षण घेत आहे. शुक्रवारी सकाळी साकोरे येथून ऐश्‍वर्या कडुसकर यांच्या मोटारसायकलवरून चास येथे एसटी पकडण्यासाठी जात होती. संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरानजीक दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे मोटारसायकलवर मागील बाजूला बसलेल्या ऐश्‍वर्यावर हल्ला केला. प्रतिकार केल्यामुळे; तसेच मोटारसायकल सुसाट नेल्यामुळे बिबट्याच्या तावडीतून तिने कशीबशी सुटका करून घेतली. अनाहूतपणे घडलेल्या घटनेमुळे ऐश्‍वर्याची बोबडी वळाली होती. तिच्या उजव्या पायाला व बोटाला मोठ्या स्वरूपाच्या जखमा आहेत. घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात औषध उपचार केल्यानंतर ऐश्‍वर्याला घरी सोडण्यात आले.

वन खात्याचे महाळुंगे पडवळ वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गाढवे, पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार सोनावले, विस्तार अधिकारी संचिता अभंग, उपसरपंच श्रीकांत चासकर यांनी घटनास्थळी भेट दिली. वन खात्याने आवश्‍यक त्या उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर यांनी केली आहे.

Web Title: leopard attact student in chas ambegaon taluka