ओतूरला खुराड्यात अडकला बिबट्या (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

ओतूर - ओतूर (ता. जुन्नर) येथील चारपडाळी येथे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या कैलास जानकू अहिनवे यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात गेला असता तेथे अडकला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.

ओतूर - ओतूर (ता. जुन्नर) येथील चारपडाळी येथे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या कैलास जानकू अहिनवे यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात गेला असता तेथे अडकला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करून जेरबंद केले.

मंगळवारी (ता. १८) सकाळी सहाच्या दरम्यान अहिनवे कुटुंबातील कविता किरण अहिनवे या कोंबड्यांना खाद्य टाकण्यासाठी व मोकळ्या सोडण्यासाठी घराजवळील खुराड्याकडे गेल्या असताना खुराड्यातून बिबट्याने डरकाळी फोडली. त्यामुळे त्यांनी घाबरून कुटुंबातील इतरांना कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्या अडकल्याच सांगितले. त्यानंतर ओतूर वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, वनपाल एस. पी. मोढवे, चैतन्य कांबळे, वनरक्षक एस. जराड, डी. एच. पवार, उदापूर येथील बिबट रेस्क्‍यू पथकाचे सदस्य बबन कुलवडे, यशवंत अमुप घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रातील डॉ. अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बिबट रेस्क्‍यू पथकाला पाचारण करण्यात आले. डॉ. अजय देशमुख यांनी बिबट्याला गुंगीचे इंजेक्‍शन मारून बेशुद्ध केले व जेरबंद केले. बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेले आहे.

सकाळी सहाच्या दरम्यान चारपडाळी 
येथे बिबट्या कोंबड्याच्या खुराड्यात अडकल्याची माहिती मिळाल्यावर वनविभागाचे कर्मचारी व माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या टीमने बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केला. भक्षाच्या शोधात बिबट्या लोखंडी जाळी तोडून कोंबड्याच्या खुराड्यात घुसला. मात्र घाबरल्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. बिबट्या दोन वर्षे वयाचा व नर जातीचा आहे. बिबट्या आढळल्यास नागरिकांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा.
- बी. सी. येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर

Web Title: Leopard in Cage