जांबूतला आणखी एक बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

शिरूर तालुक्‍यातील जांबूत जोरीलवन वस्तीवर वन विभागाने दुसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला आहे. याअगोदर या भागात एक मादी जातीचा बिबट्या जेरबंद केला होता, अशी माहिती शिरूरचे वनाधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.

टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्‍यातील जांबूत जोरीलवन वस्तीवर वन विभागाने दुसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला आहे. याअगोदर या भागात एक मादी जातीचा बिबट्या जेरबंद केला होता, अशी माहिती शिरूरचे वनाधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.

जांबूत (ता. शिरूर) जोरीलवन येथे मागील महिन्यात समृद्धी योगेश जोरी या दोन वर्षांच्या मुलीला बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या परिसरात संतापाचे वातावरण होते. बिबटे पिंजऱ्याला हुलकावणी देत होते. अखेर या परिसरात पहिल्यांदा एक पूर्ण वाढ झालेला मादी जातीचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर शनिवारी (ता. 16) पहाटेच्या वेळी दुसरा नर जातीचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. यासाठी वनपाल चारुशीला काटे, वनरक्षक सविता चव्हाण, वनपाल पी. ए. क्षीरसागर, वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ, सागर घारे, महेंद्र दाते यांनी कामगिरी केली. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

बिबट्या हा घाबरट वन्यप्राणी आहे. या परिसरात फक्त बिबट्या जातीचा प्राणी आढळून येतो. त्यामुळे अफवा पसरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नका. शेतात काम करत असताना सावधानता बाळगा. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असल्याने बिबट्यांची संख्या वाढली आहे.
- चारुशीला काटे, वनपाल, शिरूर

गेले दोन महिने परिसरात गस्त घालत आहोत. यासाठी वनकर्मचाऱ्यांनी दिवाळीची सुट्टीपण घेतली नाही. त्यातून बिबटे जेरबंद करण्यास मदत झाली आहे. नागरिकांनी वन विभागाला या परिसरात सहकार्य करणे आवश्‍यक आहे.
- विठ्ठल भुजबळ, वन कर्मचारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Cought In Shirur Tehesil