Leopard : प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विहिरींना आच्छादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

Leopard : प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विहिरींना आच्छादन

जुन्नर : कठडे नसलेल्या उघड्या विहिरींमध्ये वन्य प्राणी पडण्याच्या घटना सातत्याने होत असतात. त्यात या वन्यप्राण्यांची सुटका करण्यासाठी वन विभागासह नागरिकांना अनेक प्रयत्न करावे लागतात. तसेच, अनेक विहिरीत बुडून वन्यप्राण्यांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे या वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी कठडे नसलेल्या उघड्या विहिरींना लोखंडी जाळीची आच्छादने करण्याचा पथदर्शक प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर जुन्नर वनक्षेत्रात प्रथमच सुरू केला आहे.

वाइल्डलाइफ एसओएस संस्थेने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी सुरुवातीला ज्या विहिरीत बिबट, कोल्हा, तरस, सांबर, वानर यासारखे वन्यप्राणी पडल्याच्या घटना घडल्या आहेत, अशा कठडे नसलेल्या उघड्या विहिरींची प्रकल्पासाठी निवड केल्याची माहिती वाइल्डलाइफ एसओएसच्या जनसंपर्क अधिकारी अरिणीता संधिल्या व जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

गैरसोय नाही...

आच्छादन केलेल्या विहिरीतून शेतकरी पाणी उपसण्यासाठी आच्छादनावरील छोट्या झाकणाचा उघडझाप करून उपयोग करू शकतो. शेतकऱ्यांची गैरसोय होत नसल्याने उपक्रमाला शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांकडून संस्थेला सहकार्य होत आहे.

कठडे नसलेल्या उघड्या विहिरीत पडल्याने बिबट्यांचा जीव गेल्याच्या घटना जुन्नर वनक्षेत्रात घडल्या आहेत. विहिरींवर आच्छादन टाकण्याच्या प्रकल्पामुळे अशा दुर्घटना टाळता येणार आहेत. शेतकऱ्यांच्या उघड्या विहिरींवर लोखंडी आच्छादन टाकून त्या संरक्षित करण्यात येत असून, जुन्नर परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या विहिरींना जाळी बसवून संरक्षित केले आहे. यापुढील काळात जवळपास ५० विहिरींना हे आच्छादन टाकण्यात येणार आहे.

- अरिणीता संधिल्या, जनसंपर्क व्यवस्थापिका,

वाइल्डलाइफ एसओएस संस्था

भक्ष्याचा पाठलाग करताना गेल्या तीन वर्षांत विहिरीत पडून सोळा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. संरक्षित विहिरींच्या या प्रकल्पामुळे विहिरीत पडून बिबट्यांचे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. एकूणच वन्यजीव विहिरीत पडण्याच्या घटनांना पायबंद बसण्यास मदत होणार आहे.

- अनंत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर