कळंबला तीन दिवसांत तीन बिबटे जेरबंद (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

महाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याचे दोन बछडे सलग दोन दिवसांत पकडल्याने विरहापोटी बिबट्याची मादी सैरभैर झाली होती. मादीला पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे होते. शनिवारी रात्री तिला पकडण्यात आले. तालुक्‍यात एकाच ठिकाणी तीन बिबटे पकडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याचे दोन बछडे सलग दोन दिवसांत पकडल्याने विरहापोटी बिबट्याची मादी सैरभैर झाली होती. मादीला पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे होते. शनिवारी रात्री तिला पकडण्यात आले. तालुक्‍यात एकाच ठिकाणी तीन बिबटे पकडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

मारुती ऊर्फ बाबूनाथ कहडणे यांच्या पाच शेळ्या बिबट्याने ठार केल्या होत्या. तेव्हापासून वन खात्याने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. गुरुवारी (ता. १७), शुक्रवारी (ता. १८) या कालावधीत एक ते दीड वर्ष वयाचे दोन बिबटे पकडले. त्यामुळे मादी बछड्यांच्या शोधात इतरत्र फिरताना अनेकांनी पाहिले.

त्यामुळे शुक्रवारी रात्री पुन्हा पिंजरा लावण्यात आला. परंतु बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही. शनिवारी (ता. १९) मध्यरात्री दोनच्या सुमारास पिंजऱ्याचा खटका व बिबट्याच्या जोरदार डरकाळ्यांचा आवाज आल्याने समीर कहडणे यांना जाग आली. त्यांनी बॅटरीच्या उजेडात बिबट्या अडकल्याचे पाहिले. वन परिमंडल अधिकारी सोमनाथ खुंटे, व्ही. आर. वेलकर, कर्मचारी कोंडीभाऊ डोके व बाळू केदारी यांना बिबट्याची माहिती देण्यात आली. बिबट्याची माणिकडोह (ता. जुन्नर) येथील निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली. तीन ते चार वर्षे वयाची मादी असल्याचा अंदाज वन खात्याने व्यक्त केला आहे. 

‘कळंब परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली होती. तर लौकी परिसरातील नागरिकांचा यापूर्वी बिबट्याने रस्ता अडविला होता. त्यामुळे नागरिकांना दिवसाही शेतात काम करणे अवघड झाले होते. तालुक्‍यात बिबट्या निवारा केंद्र नसल्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे अवसरी-पेठ (ता. आंबेगाव) घाटात बिबट्यासाठी निवारा केंद्र उभारावे,’’ अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे व अमित भालेराव यांनी केली आहे.

बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी
बिबट्या पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक, टाकेवाडी, नांदूर, एकलहरे भागातील नागरिक कुटुंबांसह येत होते. त्यामुळे येथे जणू बिबट्या पर्यटन केंद्र उभारल्याचा भास होत होता.

दहा फुटांवरील डरकाळीने कर्मचाऱ्याची पाचावर धारण
निरगुडसर - पहाटे तीनची वेळ...गावाला पाणी सोडण्यासाठी निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील नह्यार वस्तीच्या नवीन विहिरीवरील वीजपंप चालू करण्यासाठी गेलेले ग्रामपंचायत कर्मचारी नामदेव भोईर यांच्या अवघ्या दहा फुटांवर बिबट्याने जोरात डरकाळी फोडली. बॅटरीचा प्रकाशझोत त्याच्यावर पडल्याने काही क्षणात भोईर यांनी काढता पाय घेऊन आपला जीव वाचवला; पण तासभर बिबट्या त्याच जागेवर बसून होता. ही घटना रविवारी (ता.२०) पहाटे घडली.

येथून जवळच असलेल्या रामदास लबडे यांच्या दीड वर्षाच्या कालवडीवर चार दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्या वेळी लबडे कुटुंबीयाने आरडाओरड केल्याने बिबट्या उसाच्या शेतात पसार झाला. त्यानंतर दोन दिवसांत त्या कालवडीचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे निरगुडसर ग्रामपंचायतीचे कर्मचारी नामदेव भोईर हे पाणी सोडण्यासाठी विद्यालयाच्या जवळून खाली डांबरी रस्ता ओलांडून जात असताना अचानक बॅटरीच्या उजेडात बिबट्या दिसला; पण बिबट्याची डरकाळी मोठी होती. अलगद मागे जात भोईर तेथून निसटले. त्यानंतर त्यांनी पुन्हा दूरवरून चार वाजता पाहिले असता, बिबट्या त्याच ठिकाणी विहिरीजवळ बसून होता. त्यानंतर ते त्या ठिकाणी गेले नाहीत. सकाळी दहाच्या सुमारास पाणी सोडण्यास गेले, त्या वेळी मात्र बिबट्या नव्हता.

जवळच असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात दररोज ५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. सकाळ-संध्याकाळ येथील नागरिक या भागात फेरफटका मारण्यासाठी येतात. परिसरात घनदाट झाडी असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Leopard kalamb