तीन फुटांवरील बिबट्यापासून वाचविले प्राण!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

निरगुडसर - उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या गणेश निघोट या तरुणासमोर अवघ्या तीन फुटांवर बिबट्याने डरकाळी फोडली. पण, गणेश याने प्रसंगावधान राखत न वळता तसाच मागे सरकत गेला. काही अंतर गेल्यानंतर त्याने घराकडे धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचविले. तब्बल दहा मिनिटे हे दोघे आमने-सामने होते. हा प्रकार नागापूर (ता. आंबेगाव) येथील निकम मळ्यात सोमवारी (ता. ३) सायंकाळी घडला.  

आंबेगाव तालुक्‍यात ऊसक्षेत्र अधिक असल्याने ऊसक्षेत्र बिबट्याचे एकप्रकारे आश्रयस्थान बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बिबट्याचे वारंवार दर्शन घडत आहे, त्यामुळे जीव मुठीत घेऊनच शेतकऱ्यांना शेतीकामे करावी लागत आहेत. नागापूर परिसरात तो अधिक प्रमाणात आहे. मागील आठ दिवसांपूर्वी निकम मळ्यातच बाबू पोहकर यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मधुकर वाघ यांच्या घराच्या पाठीमागून बिबट्याने रस्ता ओलांडताना काही प्रवाशांनी रात्रीच्या वेळी पाहिले होते. याच प्रकारे सोमवारी सायंकाळी गणेश निघोट हा उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. त्या वेळी अवघ्या तीन फुटांवर बिबट्याला पाहून त्याची बोबडीच वळली. पण, जीव वाचविण्यासाठी बिबट्याला पाहून तो पाठमोरा पळाला नाही. बिबट्या पाठीमागून हल्ला करेल, या भीतीने हातात मोठे दगड घेऊन हळूहळू तो पाठीमागे सरकला, त्यात तो अचानक जमिनीवर मागे कोसळलाही. त्या वेळी बिबट्याची डरकाळी वाढली.

पण, प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तावडीतून मागे सरकत काही अंतर गेल्यानंतर त्याने घराकडे धूम ठोकली. हा प्रकार सुमारे दहा मिनिटे सुरू होता, घरी येऊन हा प्रकार घरच्यांना सांगून त्याने सुटकेचा निःश्‍वास घेतला.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी वन विभागाला पिंजरा लावण्याची सूचना केली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक भानुदास भालेराव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मागील वर्षी याच ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Life Saving