बिबटा जीवनशैली बदलतोय...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

पुणे - माणसांच्या वस्तीजवळ राहूनही केवळ झोपलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करणं... रहदारीचा रस्ता सोईस्कररीत्या ओलांडणं...भूक लागल्यावर मिळेल त्यावर ताव मारणं, अशा पद्धतीचे बदल अंगीकारून बिबटा शहरीकरणाशी जुळवून घेत आहेत. त्यासाठी ते आपल्या जीवनशैलीत बदल करत असल्याचे निरीक्षण वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी नोंदविले आहे. हाच बदल दर्शविणाऱ्या त्यांच्या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाले आहे.

‘बीबीसी वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ या पुरस्काराने खानोलकर यांना नुकतेच गौरविण्यात आले आहे. त्यानिमित्त पुणे वन विभागातर्फे खानोलकर यांचा येत्या शनिवारी (ता. १०) सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा सर्पतज्ज्ञ नीलिमकुमार खैरे यांच्या हस्ते सायंकाळी सव्वा सहा वाजता गोखलेनगर येथील वनभवनात होईल. 

या पार्श्‍वभूमीवर खानोलकर यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी बिबट्याच्या जीवनशैलीत झालेले  बदल अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘‘स्पर्धेचे हे ५२ वे वर्ष होते, या वर्षात केवळ चार भारतीय छायाचित्रकारांना आत्तापर्यंत विविध विभागात पुरस्कार मिळाला आहे. खानोलकर यांना ‘शहरी’ या विभागात हा पुरस्कार मिळाला.

ते म्हणाले, ‘‘मुंबई शहराच्या बाजूला असणाऱ्या जंगलात या बिबट्याचे वास्तव्य असून, जंगलात असणाऱ्या वारली अदिवासी लोकांच्या जीवनाचा तो एक भाग आहे. या अदिवासी लोकांच्या घरात, लग्नपत्रिकेवर बिबट्याचे चित्र असतात. किंबहुना प्रत्येक समारंभात बिबट्याला काही-ना-काही अर्पण करण्याची प्रथा काही ठिकाणी पाहायला मिळते. २०१२ पासून मी बिबट्यावरील संशोधनास सुरवात केली, त्यानंतर २०१४ पासून गंभीर छायाचित्रणाकडे मी वळालो. गोरेगाव पूर्व येथील रहदारीच्या रस्त्यावरून निवांतपणे बिबट्या रस्ता ओलांडताना दिसतो. त्याशिवाय माणसांना काही न करता इमारतीत किंवा लोकवस्तीत जाऊन पाळलेली कुत्री खाण्याची पद्धत अनेक बिबट्यांनी स्वीकारल्याचे पाहायला मिळते. शहरीकरणाचे पडसाद वन्यजीवनावर उमटत असून, त्यामुळे बिबट्यासारख्या प्राण्यांच्या जीवनशैलीत बदल होत असल्याचे निरीक्षण अनेक जण नोंदवित आहेत. यावर अधिकाधिक संशोधन होणे आवश्‍यक आहे.’’

जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी केवळ चांगले छायाचित्र असून भागत नाही, तर त्या छायाचित्रातून एक वास्तवदर्शक गोष्ट सांगणं महत्त्वाचे असते, असेही खानोलकर यांनी सांगितले.

Web Title: Leopard lifestyle change