नागापूरला बिबट्याने अडविला रस्ता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

निरगुडसर - रात्री सव्वा दहा वाजण्याची वेळ.. नागापूर गावचे उपसरपंच सुनील शिंदे आपल्या मित्रासमवेत वास्तुशांती कार्यक्रमाहून घरी परतत असताना अचानक बिबट्याने रस्ता अडवला. जवळपास ७ ते ८ मिनिटे बिबट्याने डरकाळी फोडत रस्ता रोखून धरला होता. चारचाकी गाडी होती म्हणून दोघांच्या जिवात जीव होता, काही वेळाने बिबट्याने रस्ता सोडल्यानंतर दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला. ही घटना सोमवारी (ता.२४) राञी घडली.

नागापूर (ता. आंबेगाव) थापलिंग-भराडी रस्त्यावरील धनगरमाळी मळ्यात वास्तुशांती कार्यक्रमासाठी नागापूर गावचे उपसरपंच सुनील शिंदे व मयूर मंचरे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर राञी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीतून हे दोघे घराकडे परतत असताना येथील वस्तीजवळ डी. एन. पवार यांच्या उसाच्या शेताजवळील रस्त्यावर अचानक बिबट्या आडवा आला. जवळपास सात ते आठ मिनिटे बिबट्या रस्त्यावर डरकाळी फोडत होता.

रस्त्यातूनही जाईना, मग जोराजोरात हॉर्न वाजवल्यानंतर तो रस्त्याच्या पलीकडे गेला. तेथून पुढे वस्ती असल्याने या दोघांनी पाठीमागून गाडी घेत जवळपास अर्धा किमी माग घेतला, परंतु बिबट्या हळुवार डरकाळी फोडत चालला होता. त्यानंतर पवार यांच्या उसाच्या शेतात घुसला. परिसरातील नागरिकांना फोनद्वारे कल्पना दिल्यानंतर २५ ते ३० नागरिक जमा झाल्यानंतर फटाके वाजवण्यात आले. पुन्हा काही बिबट्या दिसला नाही, या परिसरात त्याचे अनेक वेळा दर्शन होत असल्याने वनविभागाने तातडीने याठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Leopard on Road