जिल्ह्यात लवकरच ‘बिबट्या सफारी’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

पुणे : ‘तुम्ही अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात गेलात... पण वाघच काय पण ‘बिबट्या’ही दिसला नाही, असं अनेक वेळा होतं... नाही का? पण आता चक्क बिबट्याच्याच भेटीला जाण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात येत्या वर्षभरात ‘बिबट्या सफारी’ सुरू होणार आहे. त्यासाठी चाकण, शिवनेरी पायथा आणि लोणावळा या तिन्हींपैकी एक जागा निश्‍चित केली जाईल.

पुणे : ‘तुम्ही अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात गेलात... पण वाघच काय पण ‘बिबट्या’ही दिसला नाही, असं अनेक वेळा होतं... नाही का? पण आता चक्क बिबट्याच्याच भेटीला जाण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात येत्या वर्षभरात ‘बिबट्या सफारी’ सुरू होणार आहे. त्यासाठी चाकण, शिवनेरी पायथा आणि लोणावळा या तिन्हींपैकी एक जागा निश्‍चित केली जाईल.

लोणावळ्यात तुलनेने पर्यटकांची संख्या अधिक असते, त्यामुळे सफारीलाही चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेता लोणावळ्याचे पारडे जड आहे. आफ्रिकन सफारीच्या धर्तीवर राज्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून चर्चिली जात आहे. गुजरातमधील गीर अभयारण्यात ‘सिंह सफारी’ काही वर्षांपासून सुरू आहे. पुणे वन विभागातर्फे नुकतीच या सफारीची पाहणी करण्यात आली असून, त्या धर्तीवर जिल्ह्यात ‘बिबट्या सफारी’चे नियोजन केले जात आहे. या सफारीत नैसर्गिक अधिवासात बिबट्या पाहायला मिळणार आहे.

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जीतसिंग म्हणाले, ‘‘राज्यात नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्याचा वावर तुलनेने अधिक आहे. माणसाच्या वस्तीत बिबट्या शिरत असल्यामुळे माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे अनेकदा दिसून येते. हा संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये पिंजरे लावून बिबट्याला पकडले जाते आणि बिबट्या पुनर्वसन केंद्रात काही कालावधीकरिता ठेवण्यात येते. मात्र, माणिकडोह येथील बिबट्या पुनर्वसन केंद्रात जागेचा अभाव असल्याने जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करून या केंद्रात काही वर्षांपासून असलेले बिबटे ठेवण्याचा विचार सुरू आहे.’’

चाकण, शिवनेरी पायथा आणि लोणावळा या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी दोनशे हेक्‍टरहून अधिक वनक्षेत्र आहे. त्यातील एका जागेची निवड करून तेथे ही सफारी सुरू करण्यात येईल. लोणावळा आणि शिवनेरी पायथा या दोन ठिकाणी पर्यटक येण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ अधिक असल्याने ‘बिबट्या सफारी’साठी लोणावळ्याचा विचार प्राधान्याने होऊ शकतो. जागा निश्‍चित झाल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पाठविण्यात येईल.
- जीतसिंग, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक)

Web Title: leopard safari in pune district