पुणे जिल्ह्यात होणार ‘बिबट्या सफारी’

मीनाक्षी गुरव
रविवार, 16 एप्रिल 2017

चाकण, आंबेगव्हाण, लोणावळ्याचा प्रस्ताव; गुजरातला जाणार सहा बिबटे

चाकण, आंबेगव्हाण, लोणावळ्याचा प्रस्ताव; गुजरातला जाणार सहा बिबटे

पुणे - सातत्यानं पिंजऱ्यात आणि तेही माणसाच्या आसपास राहिल्यानं... अन्‌ शिकारीशिवाय मिळणाऱ्या आयत्या खाद्यामुळे माणिकडोह येथील बिबट्या पुनर्वसन केंद्रातील बिबट्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीत बदल होत आहेत. त्यामुळेच हे बिबटे पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यास ‘फिट’ नसून, तसे केल्यास माणूस आणि बिबट्यांमधील संघर्ष अधिक ताणला जाऊ शकतो. यावर उपाय म्हणून वन विभाग आता यातील सहा बिबट्यांना अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयात पाठविण्याचा विचार करत आहे. त्याशिवाय बिबट्या सफारीसाठी चाकण, आंबेगव्हाण आणि लोणावळा अशा तीन जागांचे प्रस्ताव आले आहेत.

माणिकडोह बिबट्या पुनर्वसन केंद्राची स्थापना २००२ मध्ये झाली. त्यात कायमस्वरूपी पिंजऱ्यातच ठेवलेले २७ बिबटे आहेत. लहानपणापासून केंद्रात वाढलेले, कायमस्वरूपी अपंगत्व आलेले, दीर्घकाळापासून पिंजऱ्यात ठेवलेले, वयोवृद्ध झालेले आणि अतिआक्रमक असलेले ३४ बिबटे आहेत. त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे आता शक्‍य नाही, असे केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रातील बंदिस्त पिंजऱ्यात राहण्याची सवय झालेल्या या बिबट्यांना पुन्हा जंगलात सोडणे अशक्‍य आहे. जखमी झालेल्या प्राण्यांवर उपचार करणे आणि तो बरा झाला की त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणे, हे आमचे उद्दिष्ट आहे; परंतु काही बिबटे लहानपणापासूनच केंद्रात वाढले आहेत, तर काही अपंग, वयस्कर झाले आहेत. शिकार करून पोट भरण्याऐवजी त्यांना माणसांनी दिलेले अन्न खाण्याची सवय लागली आहे. तसेच काही बिबटे अतिआक्रमक आहेत. त्यामुळे अशा बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणे आता अशक्‍य आहे.’’

जंगलातील शिकारी प्राणी अशी बिबट्यांची नैसर्गिक जीवनशैली; मात्र पुनर्वसन केंद्रात अधिक काळ वास्तव्य केल्याने त्यांच्या अन्न शोधण्याच्या आणि जगण्याच्या नैसर्गिक शैलीत बदल होत आहे. त्यामुळे या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्यास माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष अधिक वाढण्याचे कारण ठरू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बिबट्यांचे पुनर्वसन शक्‍य
पुनर्वसन केंद्रात कायमस्वरूपी असणाऱ्यांपैकी काही बिबट्यांचे ‘बिबट्या सफारी’ उपक्रमांतर्गत पुनर्वसन करणे शक्‍य आहे. त्यासाठी वन विभाग पावले उचलत आहेत. याबाबत मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) विवेक खांडेकर म्हणाले, ‘‘बिबट्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना प्राणिसंग्रहालयात पाठविणे (रिलोकेट) आणि ‘बिबट्या सफारी सुरू करणे हे पर्याय आहेत. या केंद्रातील बिबट्यांना प्राणिसंग्रहालयात पाठविता येईल का, याचाही विचार होत आहे. या केंद्रातील ‘फिट’ असणाऱ्या सहा बिबट्यांना अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयात पाठविण्यासाठी महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे; मात्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्राणी स्थलांतरित करायचे असल्यामुळे त्याला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला आहेत. त्याशिवाय बिबट्या सफारीसाठी चाकण, आंबेगव्हाण आणि लोणावळा अशा तीन जागांचे प्रस्ताव आले असून, त्याचा पाहणी अहवाल सादर केला असून, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.’’

बिबट्याच्या पिलांना आईकडून शिकारीचे धडे मिळतात; परंतु पुनर्वसन केंद्रात आलेली अनेक छोटी पिले याच ठिकाणी मोठी झाली आहेत. त्यामुळे त्यांना नैसर्गिकरीत्या शिकार करण्याचे धडे मिळालेले नाहीत. अशा पिलांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे अशक्‍य असते. त्याशिवाय नागरिकांवर हल्ले केल्यामुळे पकडलेल्या बिबट्यांना पुन्हा सोडणे घातक ठरू शकते. म्हणूनच पुनर्वसन केंद्रात या बिबट्यांना कायमस्वरूपी ठेवावे लागणार आहे. म्हणूनच ‘बिबट्या सफारी’ हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. 
- विद्या अत्रेय, वन्यजीव अभ्यासक

Web Title: leopard safari in pune district