प्रसंगावधानाने वाचले आईचे प्राण

युनूस तांबोळी
शनिवार, 5 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): सायंकाळी पाचची वेळ. आई जनावरांसाठी घास कापत होती. मी शेतावर घास घेऊन जाण्यासाठी गेलो, तर पाहतो तर काय आईकडे दबक्‍या पावलाने काहीतरी जनावर चालत येत होते. आईच्या जवळच काही अंतरावर तो आला अन्‌ मी मोठ्याने ओरडलो आईऽऽऽ बिबट्या... बिबट्या धावा... धावा... करत मी ओरडत होतो. आई उठून उभी राहिली मोठा आवाज झाल्याने बिबट्याने धूम ठोकली. फाकटे (ता. शिरूर) येथील मुलाच्या प्रसंगावधानाची हकिगत थोरात पिंगळे वस्तीवर चर्चेचा विषय ठरली आहे.

शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. असे असताना या ठिकाणी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वन विभाग कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी (ता. 3) थोरात पिंगळे वस्तीवर वैजयंती एकनाथ थोरात या सायकांळी पाचच्यादरम्यान जनावरांसाठी घास कापत होत्या. त्या वेळी बिबट्या त्यांच्यावर झेप घेणार तेवढ्यात तेथे त्यांचा मुलगा प्रवीण थोरात आला. त्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. ही महिला मुलाच्या प्रसंगावधानाने थोडक्‍यात बचावली. राळे व थोरात या दोन्ही घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाला घटनेची माहिती दिली तरी कोणताच वन अधिकारी या घटनेला भेट देण्यास आला नाही. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी शिरूर येथील कार्यालयात जाऊन बिबट्याला जेरबंद करण्याचा तक्रार अर्ज दिला. दरम्यान, वन विभाग यावर कोणती कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कुत्र्यांमुळे वाचली चिमुकली...
थोरात पिंगळे वस्तीपासून थोड्या अंतरावर पावणेसातच्या दरम्यान दुर्गा बाळू राळे ही महिला जनावरांसाठी चारा कापत होती. तिने आपली लहान मुलगी झाडाखाली बसवली होती. या मुलीशेजारी पाळीव कुत्रे होते. त्या वेळी बिबट्याने येथे त्या कुत्र्याला पकडून जवळच्या शेतात पलायन केले. कुत्रा होता म्हणून या चिमुकलीचा प्राण वाचल्याची घटना येथे घडली आहे.

मनुष्यहानी होण्याची भीती...
शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. पाळीव प्राण्यांबरोबर मानवी वस्तीकडे फिरकणाऱ्या बिबट्यांमुळे ग्रामस्थांना दैनंदिन कामाची भीती वाटू लागली आहे. यामध्ये शेतात काम करणाऱ्या महिलांना अधिक त्रास होऊ शकतो. यासाठी या परिसरातील बिबटे जेरबंद करावेत, अशी तक्रार ज्येष्ठ शेतकरी बबनराव वाळुंज यांनी केली आहे.

Web Title: leopard in takali haji