पुण्यातील वारजे भागात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद; पाहा थरारक Video | Leopard in Warje | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

पुण्यातील वारजे भागात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद; पाहा थरारक Video | Leopard in Warje

पुणे : आज सकाळी पुणे शहर परिसरातील वारजे जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

दरम्यान, न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर व्हिडिओ मध्ये टिपला गेलेला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा हा व्हिडिओ व्हायरल केला होता. यामध्ये तो अस्पष्ट दिसत होता. त्यानंतर या ठिकाणी वन विभागाची अॅनिमल रेस्क्यू टीम पोचली. त्यांनी या ठिकाणी येऊन इमारतीच्या लगत असलेल्या पत्र्याचे शेडच्या कडेने बिबट्याला पकडण्यासाठी जाळी लावली होती.

बिबट्याला पकडण्याची तयारी सुरू असताना स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी घटनास्थळी वारजे पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील पोहोचले होते.

पकडण्याची तयारी सुरू असताना बिबट्या शेडमधून पळाला होता. पण शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध करून घेऊन गेले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती.