जुन्नरमधील आंबेगव्हाणला बिबट्या सफारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

उदापूर - आंबेगव्हाण (ता. जुन्नर) परिसरातील वनक्षेत्र बिबट्या सफारी प्रकल्पासाठी योग्य आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक ती नैसर्गिक व भौगोलिक स्थिती या परिसरात आहे, अशी माहिती वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे दिली.

उदापूर - आंबेगव्हाण (ता. जुन्नर) परिसरातील वनक्षेत्र बिबट्या सफारी प्रकल्पासाठी योग्य आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक ती नैसर्गिक व भौगोलिक स्थिती या परिसरात आहे, अशी माहिती वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे दिली.

प्रस्तावित बिबट्या सफारी प्रकल्पासाठीच्या वनक्षेत्राची पाहणी खारगे यांनी तज्ज्ञांच्या पथकासह केली. यावेळी आमदार शरद सोनवणे, वनविभागाचे अधिकारी विवेक खांडेकर, अर्जुन म्हसे, युवराज मोहिते, डॉ. अजय देशमुख, सचिन रघतवान, जयंत पिसाळ, विघ्नहर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, किरण कुटे, प्रकाश हिंगणे, प्रवीण बडबडे, राजेंद्र गायकर, चिंतामणी घोलप, भानुदास गायकर, जयसिंग पोटे, दत्तात्रेय गवांदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

खारगे म्हणाले, की आंबेगव्हाण या ठिकाणी बिबट्या सफारी प्रकल्पास सरकारची मान्यता मिळाली आहे. प्रत्यक्ष वनक्षेत्राची पाहणी करून येथील जागा या प्रकल्पासाठी योग्य असल्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. केंद्राच्या मान्यतेसाठी राज्य सरकारतर्फे लवकरच प्रस्ताव पाठविला जाणार आहे. 

सोनवणे म्हणाले, की बिबट्या सफारी प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. राज्य सरकारकडून स्थळ पाहणीचा अहवाल केंद्राला पाठविला जाईल. केंद्राच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. जुन्नर तालुक्‍यातील पर्यटनाला या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.  

दरम्यान, खारगे यांनी शिवनेरी किल्ला, वनविभागाची रोपवाटिका तसेच माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्राला भेट दिली. तसेच चाळकवाडी येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहत वृक्षलागवडीचे आवाहन केले.

Web Title: leopard travel in ambegavan