आधी मगर, आता बिबट्या...शेतकरी म्हणतात, आम्ही जगायचं कसं?

डाॅ. संदेश शहा
Thursday, 23 July 2020

इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रातील भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रुक, चितळकर वाडी या भागात बिबट्याचे अस्तित्व दिसून आले आहे.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रातील भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रुक, चितळकर वाडी या भागात बिबट्याचे अस्तित्व दिसून आले आहे. बिबट्याने बुधवारी (ता. २२) भावडी येथील शेतकरी सोमनाथ मदने यांच्या शेळीचा फडशा पाडला. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. सकाळी बिबट्या प्रत्यक्ष दिसल्यानंतर दुपारी वनखात्यास याची माहिती देण्यात आली असून, इंदापूर वनक्षेत्रपाल अधिकारी राहुल काळे यांनी कौठली वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

 नापास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, पास होण्याची संधी आलीये चालून...

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रुक, चितळकरवाडी या गावात उसाचे प्रचंड क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात बिबट्याने तळ ठोकला असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. सकाळी भावडी येथील शेतकरी सोमनाथ मदने यांच्या शेळीचा वन विभागाशेजारील बळशिदबुवा मंदिराजवळील शेतात बिबट्याने फडशा पाडला, तर आगोती क्रमांक 1 चे शिवाजी गोळे, वरकुटे बुद्रुकचे प्रताप फाळके, शिवाजी पाडूळे,चितळकर वाडीचे वैभव चितळकर या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बिबट्यास पाहिले असल्याचे सांगितले. शिवाजी गोळे यांनी बिबट्याचे ठसे शेतात आढळल्याचे सांगितले. 

भाजयुमो आक्रमक, जय श्रीराम असलेली दहा लाख पत्रे शरद पवारांना पाठवणार

या भागात उसाचे प्रचंड प्रमाणात क्षेत्र असून, रात्रीच्या तीन दिवस वीज असते. अंधारात एकट्या दुकट्याला शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे बिबट्यामुळे शेती पिकाला पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मागे दोन वेळा उजनी पाणलोट क्षेत्रात मगर आढळली होती. त्याचा मत्स्य व्यवसायिकांनी मोठा धसका घेतला होता. इंदापूर तालूक्याचे लोकप्रतिनिधी, राज्याचे वन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आहेत. यांनी यासंदर्भात वनखात्याच्या अधिकाऱ्यांना नागरिक व पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopards have been spotted in the Ujani catchment area of ​​Indapur taluka