कुष्ठरोग निर्मूलनासाठीच आनंदवन - डॉ. आमटे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे - ""कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णांना त्यापासून मुक्त करण्यासाठीच बाबांनी आनंदवनची सुरवात केली. मात्र, कुष्ठरोग जगातून हद्दपार व्हावा आणि कुष्ठरोगाचे पूर्णपणे निर्मूलन होऊन आनंदवन बंद व्हावे, हेच आनंदवनचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट आहे,'' अशी भावना महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी गुरुवारी व्यक्त केली. 

पुणे - ""कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णांना त्यापासून मुक्त करण्यासाठीच बाबांनी आनंदवनची सुरवात केली. मात्र, कुष्ठरोग जगातून हद्दपार व्हावा आणि कुष्ठरोगाचे पूर्णपणे निर्मूलन होऊन आनंदवन बंद व्हावे, हेच आनंदवनचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट आहे,'' अशी भावना महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी गुरुवारी व्यक्त केली. 

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) आयोजित चौथ्या राष्ट्रीय "सामाजिक नवउपक्रम परिषदे'चे उद्‌घाटन डॉ. आमटे यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व "पीआयसी'चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, निवृत्त पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर, केंद्राचे संचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते. स्तनाच्या कर्करोगाचे अल्पदरात निदान करणारे यंत्र विकसित करणाऱ्या "आय ब्रेस्ट एक्‍झाम'च्या मिहीर शहा यांना डॉ. आमटे यांच्या हस्ते "अंजनी माशेलकर सर्वसमावेशक सामाजिक नवउपक्रम' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. आमटे म्हणाले, ""आनंदवन हे सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारी (सीएसआर) ही संकल्पना मांडणारे देशातील पहिले उदाहरण असून, ते पहिले "स्मार्ट व्हिलेज' आहे. आनंदवनात कुष्ठरोग्यांनी एकत्र येऊन अनेक नवे उपक्रम सुरू केले. कुष्ठरोगी, अंध, अपंगांनी एकत्र येत केलेला "स्वरानंदनवन' हा कार्यक्रम देशभरात गाजला. परदेशातूनही या कार्यक्रमास निमंत्रणे येत आहेत; मात्र तांत्रिक कारणांमुळे ते रखडले आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने अनेक नवनवीन प्रयोग आनंदवनात राबविणे शक्‍य झाले आहे.'' 

डॉ. माशेलकर म्हणाले, ""कोणताही शोध हा नवउपक्रमात परावर्तित होऊन, तो प्रत्यक्ष व्यवहारात उतरणे गरजेचे असते. भारतासारख्या देशात असे नवउपक्रम सर्वांना परवडणारे असतील, तरच त्यातून देश बदलू शकेल. अशा सर्वसमावेशक उपक्रमांची निर्मिती करणे, हेच या परिषदेचे उद्दिष्ट आहे. मनात आलेल्या संकल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याचा उपयोग समाजासाठी करणे आवश्‍यक आहे.'' 

प्रा. अब्दुल शबन, प्रदीप लोखंडे आणि डॉ. विपिन कुमार या तिघांच्या अध्यक्षतेखाली "आदिवासी, ग्रामीण व शहरी सामाजिक नवउपक्रम' या विषयावरील परिसंवाद झाला. त्यामध्ये डॉ. विश्‍वजित पंड्या, सुनील कामाडी, राहीबाई पोपेरे, गिरीश जठार, माधव लिकमी, शंकर गावडे, विजा तिम्मा, रविकिरण एलांगवन, कौस्तुभ जोग, कृष्णा राजगोपाल, मिलन दास, विनयकुमार काटे, पंडित पाटील, शिवाजी नवगिरे, जवाद पटेल, शुभ ढोलकिया, अरूप दत्ता, धनश्री चौहान, योगेश मालखरे, एल्सा डिसिल्व्हा, नीरव मांडलेवाला यांनी आपली मते मांडली. सात राज्यांमधील संशोधक, "सीएसआर' प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 

Web Title: leprosy Elimination - dr amte