पुण्याने दिला गर्भाशय प्रत्यारोपणाचा धडा

योगिराज प्रभुणे
रविवार, 21 मे 2017

पुण्यातील गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने देशाच्या वैद्यकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पहिली शस्त्रक्रिया करून पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी या शस्त्रक्रियेचा धडा देशाला दिला आहे. दुर्बिणीच्या साह्याने काढलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाचा जगातील पहिला यशस्वी प्रयोग पुण्यात झाला आहे. प्रत्यारोपित गर्भाशयातून पहिले अर्भक पुण्यातच जन्म घेणार असल्याने देशाच्या वैद्यकीय इतिहासात याची ठळक नोंद होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.
 

पुण्यातील गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने देशाच्या वैद्यकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पहिली शस्त्रक्रिया करून पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी या शस्त्रक्रियेचा धडा देशाला दिला आहे. दुर्बिणीच्या साह्याने काढलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाचा जगातील पहिला यशस्वी प्रयोग पुण्यात झाला आहे. प्रत्यारोपित गर्भाशयातून पहिले अर्भक पुण्यातच जन्म घेणार असल्याने देशाच्या वैद्यकीय इतिहासात याची ठळक नोंद होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.
 

पुण्यातील गॅलॅक्‍सी केअर लॅप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटमध्ये देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुरुवारी यशस्वी झाली. त्या पाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका महिलेवर गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले. या शस्त्रक्रियेने देशाच्या वैद्यकीय इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला. हे एक सांघिक यश आहे. यात शल्यचिकित्सकापासून ते स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, कार्डिओथोरॅटिक सर्जन, मानसोपचार तज्ज्ञ, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ अशा वेगवेगळ्या विशेषज्ज्ञ डॉक्‍टरांचा समावेश त्यात केला आहे.  

असा झाला गर्भाशय प्रत्यारोपणाचा निश्‍चय
गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शेकडो शस्त्रक्रिया होतात. या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीतून होतात. मात्र, गर्भाशय दान करणाऱ्या महिलेवर १४ तासांची शस्त्रक्रिया होते. ही पद्धत बदलण्याची गरज असल्याचा विचार पुण्यातील डॉक्‍टरांच्या मनात आला. त्या दृष्टीने डॉक्‍टरांच्या पथकाने विचार करायला सुरवात केली आहे. दुर्बिणीतून गर्भाशय काढण्याची संकल्पना यातून पुढे आली. त्यामुळे गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेचा वेळ साडेचार तासांपर्यंत कमी आला.

परदेशातील प्रशिक्षण आणि देशातील कौशल्य
गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया स्वीडन येथील एका केंद्रात केली जाते. त्या केंद्रातून गर्भाशय प्रत्यारोपणाचे धडे पुण्यातील विशेषज्ज्ञ डॉक्‍टरांनी घेतले. त्यात गॅलॅक्‍सी केअर लॅप्रोस्कोपिक इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. शैलेश पुणतांबेकर, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. मिलिंद तेलंग यांचा त्या पथकात समावेश होता. सुरवातीला स्वीडन येथील डॉक्‍टरांनी पुण्यात गर्भाशय प्रत्यारोपणासाठी येण्याची तयारी दर्शविली होती. पण, नंतर ते शक्‍य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे देशातील पहिली शस्त्रक्रिया करण्यासाठी परदेशातील प्रशिक्षण आणि देशातील डॉक्‍टरांचे शल्यचिकित्सेतील कौशल्य अत्यंत महत्त्वाचे ठरले, असा विश्‍वास या पथकातील डॉक्‍टरांनी व्यक्त केला. 

गर्भाशय प्रत्यारोपणाची तयारी
एका दिवसात ठरवून गर्भाशय प्रत्यारोपण होत नाही. या शस्त्रक्रियेसाठी पाच ते सहा महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू होती. प्रशासकीय पातळीवरील मान्यता, कायदेशीर प्रक्रिया, वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकता, शस्त्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन, शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कार्डिओथोरॅटिक सर्जन, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ, जंतूसंसर्ग नियंत्रण तज्ज्ञापासून ते शस्त्रक्रिया कक्षातील प्रत्येक घटकापर्यंत सर्वजण या शस्त्रक्रियेची तयारी करत होते.

या सर्व प्रक्रियेमध्ये सरकारी यंत्रणेचे मोठे सहकार्य मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांच्यापासून ते सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्यापर्यंत प्रत्येकाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे भारतात ही शस्त्रक्रिया यशस्वी करता आली.
- डॉ. शैलेश पुणतांबेकर, कर्करोग शल्यचिकित्सक

जगात साडेचार हजारांमध्ये एका महिलेत जन्मतः गर्भाशय नसते. त्यामुळे प्रत्येक महिलेला या शस्त्रक्रियेची गरज राहात नाही. गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही सुरवात आहे. त्यानंतर या गर्भाशयात गर्भ सोडणे. त्याची वाढ होणे. त्यानंतर सीझर करून प्रसूती केली जाईल, असे याचे पुढील टप्पे आहेत.
- डॉ. मिलिंद तेलंग, स्त्री रोग आणि प्रसूती रोग तज्ज्ञ  

गर्भाशयाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या व्यवस्थित काढून त्या दुसऱ्या महिलेमध्ये पुन्हा अचूक जोडण्याचे आव्हान असते. ते गर्भाशय जिवंत राहण्यासाठी रक्तपुरवठा होणे आवश्‍यक असते. त्याशिवाय गर्भाशय त्या स्त्रीच्या शरीरात जिवंत राहू शकणार नाही.
- डॉ. संजीव जाधव, 
कार्डिओथोरॅटिक सर्जन 

Web Title: Lesson of uterine transplant given by Pune