शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देऊ : खासदार आढळराव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

अधिकारी मनमानी करतात, अशा तक्रारी बाधित शेतकऱ्यांनी मांडल्या. या वेळी आढळराव पाटील यांनी रस्त्याचे काम होताना बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. 

चाकण : ""पुणे- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादन होणाऱ्या जमिनीस योग्य मोबदला दिला जाईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत भूसंपादन अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. 5) बैठक घेणार आहे. नव्याने मोजणी करून प्रत्यक्षात किती क्षेत्र संपादित होत आहे, याची खातरजमा केली जाईल. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही,'' असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. 

पुणे- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या खेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची बैठक आज खासदार आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांच्या उपस्थितीत चाकण येथे झाली, त्या वेळी ते बोलत होते. चिंबळी, कुरुळी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, चाकण, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, भाम संतोषनगर, शिरोली, चांडोली या गावांतील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुंदीकरणासाठी या गावांतील जमिनी संपादित होणार आहेत. यापूर्वीच्या संपादनात काहींना अत्यंत कमी मोबदला मिळाला, तर काहींना मिळालाच नाही. काहींचे क्षेत्र अधिकचे जाऊनही ते मोबदल्यापासून वंचित राहिले. संपादनाच्या नकाशात अनेक चुका आहेत. ज्यांचे क्षेत्र संपादनात गेले नाही, त्यांना मोबदल्याच्या नोटिसा दिल्या आहेत. 

अधिकारी मनमानी करतात, अशा तक्रारी बाधित शेतकऱ्यांनी मांडल्या. या वेळी आढळराव पाटील यांनी रस्त्याचे काम होताना बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. 

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव जाधव, किरण मांजरे, संतोष डोळस यांची भाषणे झाली. बाबाजी काळे, शांताराम भोसले, प्रकाश वाडेकर, रवींद्र करंजखेले, लक्ष्मण जाधव, नवनाथ मुटके, किशोर शेवकरी, प्रीतम परदेशी, योगेश झगडे, नवनाथ कड, हेमंत जैद, एकनाथ सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थित होते. भालेराव कड यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Let the farmers get the right compensation says MP Shivajirao Adhalrao