निवासाबाबतचा पुण्याचा लौकिक राखूया - मोहोळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

कसे नोंदविणार मत? 
सर्वेक्षणात सहभाग घेण्यासाठी पुणेकरांनी http://eol२०१९.org/citizenfeedback या लिंकवर जाऊन योग्य पर्याय निवडून चोवीस प्रश्नांवर अभिप्राय नोंदवायचा आहे. शहरातील शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण व निवारा, गतिशीलता, राहणीमानाचा दर्जा, पाणीपुरवठा, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा व सुरक्षितता, मनोरंजन, करमणूक, आर्थिक क्षमता, आर्थिक संधी, शाश्वतता, पर्यावरण, हरित ठिकाणे व इमारती, विजेचा वापर, सार्वजनिक सेवा, प्रशासन सेवा, पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेबरोबर इतर सुविधांविषयीच्या प्रश्नांवर उत्तरे द्यायची आहेत.

पुणे - ‘आपले शहर राहण्यासाठी सर्वोत्तम असल्याचा लौकिक आपल्याला कायम ठेवायचा आहे. त्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात सहभाग घ्या,’’ असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी नागरिकांना केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी (२०१८) केलेल्या सर्वेक्षणात राहण्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. केंद्र सरकारने या वर्षीही ‘इज ऑफ लिव्हिंग’ सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. येत्या २९ फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात नागरिकांचे अभिप्राय नोंदविले नव्हते, यंदा मात्र हे अभिप्राय नोंदविण्याची अट सर्वेक्षणात टाकण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांकडून मते जाणून घेतली जाणार आहेत. सन २०१८ प्रमाणे यंदाही देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून पुण्यालाच मान मिळावा, यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मोहोळ यांनी केले. 

भारताचे 4 अवकाशवीर प्रशिक्षणासाठी रशियाला रवाना

या वेळी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.

स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणामध्ये ११४ शहरांचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यात संस्था व प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा (शिक्षण, आरोग्य), आर्थिक आणि भौतिक संरचना अशा चार श्रेणीमध्ये एकूण १५३ संकेतकांच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या संकेतानुसार राहण्यायोग्य शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let us preserve the residence Pune murlidhar mohol