आंबेगाव तालुक्यात राजकीय नेत्यांच्या गावात 'थोडी ख़ुशी, थोडा गम'

डी. के. वळसे पाटील
Tuesday, 19 January 2021

वळती, शेवाळवाडी, दरेकरवाडी, आदर्शगाव भागडी, आदर्शगाव गावडेवाडी, महाळुंगे पडवळ, पिंपळगाव तर्फे महाळुंगे या गावांमध्ये निवडणुका गाजल्या.

मंचर : आंबेगाव तालुक्यात काही राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये आपली सत्ता कायम ठेवली आहे. तर काही नेत्यांना झटका बसला असून, निकाल आत्मचिंतन करण्यास लावणारे आहेत.

वळती, शेवाळवाडी, दरेकरवाडी, आदर्शगाव भागडी, आदर्शगाव गावडेवाडी, महाळुंगे पडवळ, पिंपळगाव तर्फे महाळुंगे या गावांमध्ये निवडणुका गाजल्या. येथील घडामोडी लक्षवेधक ठरल्या आहेत.

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे यांची वळती ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्ष निर्विवाद सत्ता होती. एकूण ११ जागांपैकी फक्त एकच जागा लोंढे यांना जिंकता आली. राष्ट्रवादीचे नेते धोंडीभाऊ भोर यांनी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणुकीमध्ये दणदणीत विजय संपादन केला. त्यामुळे लोंढे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. 

पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मथाजी पोखरकर यांच्या पुढे अनेक अडचणी उभ्या करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी राजकीय खेळी करून शिवसेनेचे वसंत राक्षे यांना बिनविरोध संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. त्यामुळे येथे एकूण तेरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. येथे अटीतटीची लढत झाली.

आदर्शगाव भागडी ग्रामपंचायतीवर भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक किसनराव उंडे यांच्या नेतृत्वाखालील पँनेलने घवघवीत यश संपादन केले. सहा पैकी चार जागा त्यांनी जिंकल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्हा परिषद शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी दरेकरवाडी-काळेवाडी ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. नऊ जागांपैकी शिवसेनेला पाच जागा मिळाल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात यांच्या शेवाळवाडी गावात शिवसेनेने बाजी मारली आहे. येथे नऊ जागांसाठी निवडणूक झाली. शिवसेनेचे अशोक थोरात व योगेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली पँनेलने सहा जागा जिंकल्या आहेत. 

आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर यांच्या अवसरी खुर्द गावात १७ पैकी सोळा जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पँनेलने जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे.
आंबेगाव तालुका सहकारी देखरेख संघाचे संचालक ऋषिकेश गावडे यांनी आदर्शगाव गावडेवाडीत महाविकास आघाडीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. शिवसेनेचे माजी सरपंच देवराम गावडे यांची हि चांगली साथ मिळाली. या दोन नेत्यांनी गावातील विकास कामांसाठी गावकऱ्यांना एकत्र आणले आहे. महाविकास आघाडीची सरशी झाली.

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला

महाळुंगे पडवळ येथे शिवसेनेचे नेते बाबाजी चासकर यांनी सत्ता स्थापन करून भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब पडवळ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते के. के. सैद यांना धक्का दिला आहे. भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांच्या जवळे गावात उद्योजक अनिकेत खालकर यांच्या पँनेलने नऊ जागांपैकी आठ जागा जिंकल्या आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: letest political developments in ambegaon taluka