जिजामाता पुरस्कार पुन्हा सुरू करू - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

पुणे - राज्य सरकारकडून महिला क्रीडापटूंना प्रोत्साहनपर देण्यात येणारा "जिजामाता' पुरस्कार एका वर्षातच बंद पडला. हा पुरस्कार का बंद केला, त्याची माहिती घेऊन पुन्हा तो सुरू करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले.

पुणे - राज्य सरकारकडून महिला क्रीडापटूंना प्रोत्साहनपर देण्यात येणारा "जिजामाता' पुरस्कार एका वर्षातच बंद पडला. हा पुरस्कार का बंद केला, त्याची माहिती घेऊन पुन्हा तो सुरू करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले.

नॅशनल स्पोर्टस ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या "तुळजाभवानी क्रीडा पुरस्कार' वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, मनपा क्रीडा समितीचे अध्यक्ष सम्राट थोरात आदी उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत यांना "जीवनगौरव' पुरस्कार देण्यात आला; तर नेमबाजपटू हीना सिद्धू, ऐश्‍वर्या सातव, क्रीडा पत्रकार मेधा कुचिक, अपूर्वा कुंभकोणी, महाराष्ट्रीय मंडळाच्या प्राचार्या नेहा दामले, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणे, ऋचा पुजारी, नभा भांबुर्डेकर, महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार रेखा भिडे, अंजली रहाणे-पाटील, श्रेया नानकर यांनाही गौरविण्यात आले. गुणवंत जरांडे यांना जाहीर झालेला मरणोत्तर पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला.

सहकारमंत्री पाटील म्हणाले, 'प्रत्येक क्षेत्रात महिलांची भरीव कामगिरी होत असते. जिजामाता पुरस्काराबाबत माहिती घेऊन क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करू; तसेच ट्रस्टच्या वतीने जे ऑलिंपिक संग्रहालय उभारणी, खेळाडूंसाठी मदत आणि समुपदेशन केंद्र उभारण्यामध्ये राज्य सरकार म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करू.''

महापौर टिळक म्हणाल्या, 'सध्याच्या परिस्थितीत महापौर चषक स्पर्धा घेताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला जातो. यापुढे महापौर चषक स्पर्धा ही शहरासोबत जिल्हा पातळीवरदेखील घेण्यात येईल; तसेच महापालिका स्तरावर खेळाडूंसाठी आवश्‍यक ते सहकार्यही केले जाईल.''

दीप्ती चवधरी यांनी प्रास्ताविक केले. मनीषा कोंढाळकर-घाटे, स्मिता शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले. गुरुबन्स कौर यांनी आभार मानले.

Web Title: Let's start again Jeejamata Award