आयुष्य उत्सवासारखे जगा - नीला सत्यनारायण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

पुणे - 'आयुष्य तक्रार करण्यासाठी नाही. तक्रारी, अडचणी यावर मात करत आणि इतरांबरोबरच स्वत:शी संवाद साधत आयुष्य उत्सवासारखे जगता आले पाहिजे,'' असे सांगत निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण तणावमुक्त जीवनाचा मंत्र दिला.

पुणे - 'आयुष्य तक्रार करण्यासाठी नाही. तक्रारी, अडचणी यावर मात करत आणि इतरांबरोबरच स्वत:शी संवाद साधत आयुष्य उत्सवासारखे जगता आले पाहिजे,'' असे सांगत निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण तणावमुक्त जीवनाचा मंत्र दिला.

सत्यनारायण यांच्या "डेल्टा 15' या पुस्तकाच्या निमित्ताने "सकाळ प्रकाशना'तर्फे शनिवारी गप्पांची मैफल आयोजिण्यात आली होती. यात सत्यनारायण यांनी देश-परदेशातील वेगवेगळ्या कथांची गुंफण करत वाचकांशी मुक्त संवाद साधला. कधी पतंगाची गोष्ट सांगत, तर कधी मुंबई-पुणे प्रवासावर आधारित कथा सांगत त्यांनी प्रेक्षकांना गुंतवून नवी शिकवणही दिली.

सत्यनारायण म्हणाल्या, 'निवृत्त झाल्यानंतर मी मनन, चिंतन, आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करू लागले. तेव्हा मला संवाद तुटत चालला आहे, हे जाणवले. माणसामाणसांतील, कुटुंबातील नाते हरवत चालले आहे. कुटुंबात हल्लीचे आई-वडील दिसण्यापुरते झाले आहेत. "सोशल मीडिया'मुळे ते पाल्यांशी फार बोलत नाहीत. मुलेही वेगवेगळ्या गेम्समध्ये अडकले आहेत. त्यामुळे संवादाची जागा आता राहिली नाही. हे चित्र बदलायला हवे. कौटुंबिक, कार्यालयीनच नव्हे, तर वाहतूक, प्रदूषण अशा गोष्टींमुळेही आता मानसिक ताण वाढू लागला आहे. तो घालवण्यासाठी संवाद हवा.''

अडचणी सोडविण्यासाठी परिघाराबाहेर जाऊन विचार करा. स्वत:शी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. मनन, चिंतनासाठी वेळ द्या. ज्यांनी तुम्हाला दु:ख दिले त्यांना क्षमा करा. त्यामुळे स्वत:चेच मन हलके होईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: life enjoy the festival