पुणे : तब्बल 22 वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा रद्द

पुणे : तब्बल 22 वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा रद्द

पुणे : सत्र न्यायालयाने सात आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. मात्र, आता तब्बल 22 वर्षांनंतर ही जन्मठेपेची शिक्षा रद्द करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 

बारकू चंदर जगताप (वय 34), श्रीकांत खंडू माकर (वय 41), दत्तू सावळा भालेराव (वय 59), श्रीरंग दत्तू भालेराव (वय 29), निवृत्ती संतू यादव (वय 59), लहू दत्तू भालेराव (वय 26) आणि गेणभाऊ लक्ष्मण साठे (वय 32, सर्व रा. खुळे मुळशी) यांची सुटका करण्यात आली. 1993 साली बिरा कासकर व त्याचे नातेवाईक हे आपल्या कुटुंबासह खुळे येथे मुक्कामास आले होते. घटनेच्या दिवशी बारकू जगताप हा रस्त्याने जात असताना त्याच्या अंगावर कुत्रे भुंकले. त्यामुळे त्याने कुत्र्याला लाथ मारली व कासकर यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली व जगताप याने परिसरातील लोकांना घेऊन येतो, अशी धमकी कासकर कुटुंबीयांनी दिली. त्यानंतर जगताप हा इतर आरोपींनी घेऊन आला. सर्वांची मिळून बिरा व त्याच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. त्यात बिरा यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

पोलिसांनी सातही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून खून केल्याबाबतचे दोषारोपपत्र येथील सत्र न्यायालयात दाखल केले. 1997 साली त्याची सुनावणी झाली. सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. पुणे सत्र न्यायालयाचा निकाल हा चुकीच्या निष्कर्षावर असून, आरोपींच्या विरुद्ध काहीही पुरावा नसल्याचा बचाव आरोपींच्या वतीने ऍड. दीपक गिरमे, ऍड. नितीन देशपांडे आणि ऍड. सिद्दार्थ चपळगावकर यांनी केला. या अपीलाची सुनावणी न्यायाधीश एस. एस. शिंदे व नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर झाली.

पोलिसांनी सादर केलेला पुरावा हा पुरेसा नाही. आरोपीची ओळख परेड न घेणे, साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या विसंगती व तपासातील त्रुटी बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. आरोपीचा बचाव मान्य करून, न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन त्यांची जन्मठेप रद्दबातल ठरविली 22 वर्षांनंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com