आई, पत्नी, मुलीचा खून करणाऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे : कर्जाला कंटाळल्यामुळे आई, पत्नी व सात वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. असहाय व निष्पापांचा खून करण्याच्या क्रूर घटनेबद्दल आरोपीला कडक शिक्षा दिल्याचे न्यायालयाने नमूद केले.

पुणे : कर्जाला कंटाळल्यामुळे आई, पत्नी व सात वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या आणि स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. असहाय व निष्पापांचा खून करण्याच्या क्रूर घटनेबद्दल आरोपीला कडक शिक्षा दिल्याचे न्यायालयाने नमूद केले.

सागर माधव गायकवाड (वय 40, रा. जांभूळकर मळा, फातिमानगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आई शंकुतला (वय 58), पत्नी कविता (वय 34) व मुलगी इशिता (वय 7) या तिघींचा 9 एप्रिलला 2014 रोजी गळा आवळून खून केला होता. तर याप्रकरणी सहाय्यक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी 16 साक्षीदार तपासले. त्यामध्ये मित्राची साक्ष, सीसीटीव्ही फुटेज, घरातून जप्त केलेल्या सीपीओमधील हार्डडिक्‍समध्ये त्याने आत्महत्येचा क्रम ठरविलेली माहिती पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली. 

सागर व कविताचा 2003 मध्ये प्रेमविवाह झाला होता. कविता शिक्षिका म्हणून तर सागर हा कार चालविण्याचे काम करत होता. कर्जावर घेतलेल्या गाडीचे हप्ते सुरू असतानाच त्याने खासगी सावकाराकडून एक लाख 90 हजार रुपये शेअर ट्रेडींगसाठी घेतले होते. सावकाराने पैसे देण्यासाठी तगादा लावला, त्यानंतर कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकीही दिली होती. कर्जाच्या जाचातून सुटण्यासाठी त्याने स्वतःसह कुटुंबाला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सागर वाचला, त्यानंतर त्याने स्वतः पोलिसात हजर होऊन घटना सांगितली. दरम्यान न्यायालयामध्ये त्याने तिघींचा खून तिऱ्हाईतानेच केल्याचे सांगून साक्ष फिरविली. मात्र तिघींना गळफास व झोपेच्या गोळ्या घालून संपविण्यात आल्याचे अॅड. कावेडिया यांनी न्यायालयासमोर मांडले. त्यानुसार न्यायालयाने त्यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

म्हणून फाशीची शिक्षा नाही ! 
सरकारी वकिलाने ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्यामुळे फाशी देण्याची मागणी केली, मात्र ही घटना दुर्मिळ नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकार विरुद्ध निसार रमझान सय्यद या प्रकरणाचा दाखला देत आणि विधी आयोगाच्या अहवालानुसार, दहशतवादी व सरकारविरोधी गुन्हे करणाऱ्यांनाच फाशी दिली जात असल्याचे स्पष्ट करून सागर गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा सुनावत असल्याचे सांगितले. 

Web Title: Life imprisonment till mother, wife, girl's killer dead