पुणे : म्हात्रे पुलावरुन उडी मारणाऱ्याला अग्निशमन जवानाकडून जीवदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

शहर परिसरात गणेशोत्सवाच्या काळात खडकवासला धरणातून रोजच पाण्याचा विसर्ग कमी जास्त होत आहे. दरम्यान, म्हात्रे पुलावरुन नदीपात्रात एकाने उडी मारल्याचा प्रकार समोर आला. अग्निशामक दलामुळे त्यास जीवनदान मिळाले.

पुणे : शहर परिसरात गणेशोत्सवाच्या काळात खडकवासला धरणातून रोजच पाण्याचा विसर्ग कमी जास्त होत आहे. दरम्यान, म्हात्रे पुलावरुन नदीपात्रात एकाने उडी मारल्याचा प्रकार समोर आला. अग्निशामक दलामुळे त्यास जीवनदान मिळाले.

आज दुपारी विसर्ग नऊ हजार असताना बारा नंतर एका 45 वर्षाच्या व्यक्तीने डेक्कन जवळील म्हात्रे पुलावरुन अचानक खाली पाण्यात उडी मारली. त्यानंतर लगेचच गणपती विसर्जनानिमित्त विविध घाटांवर बंदोबस्ताकरिता असलेले अग्निशमनदलाचे जवान व जीवरक्षक यांना नागरिकांनी आवाज देत घटना सांगितली. अग्निशमन दलाचे जवान जितेंद्र कुंभार यांनी तातडीने पाण्याकडे धाव घेतली. पाण्यात उडी मारणारा व्यक्ती म्हात्रे पुलाकडून गरवारे पुलाच्या दिशेने हात पाय मारत होता. त्याचवेळी जवान कुंभार यांनी प्रकाश काची व अमोल गायकवाड या दोघा जीवरक्षकांच्या मदतीने पाण्यात मधोमध त्यांच्या दिशेने दोर फेकला. दोर जवळ येताच त्या व्यक्तीने दोर पकडला. जवान व जीवरक्षक यांनीतो दोरओढून त्या व्यक्तीला सुखरुप पाण्याबाहेर काढले.

त्या व्यक्तीला उडी मारण्याचे कारण विचारले असता तो काही सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याचे जाणवले. याबाबत जवान जितेंद्र कुंभार म्हणाले, “याचे आम्ही प्राण वाचविले व यामध्ये  जीवरक्षकांनी मदत केली. त्या इसमास पोहता येत होते असे प्राथमिक निदर्शनास आल्याने आम्ही दोर टाकला. अन्यथा मी व जीवरक्षक यांनी पाण्यात उतरुन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केलाच असता. त्या इसमाचे बंधूना संपर्क करुन सदर इसमास आम्ही त्यांच्याकडे दिल्याचे ही कुंभार यांनी सांगितले.” कर्तव्य बजावत जवान कुंभार व जीवरक्षकांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक नागरिकांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life saved of one who jump from mhatre bridge by fire bridge officer in pune