एमपीएससी क्‍लाससाठी रात्रभर रांगा

प्रवीण खुंटे
मंगळवार, 5 जून 2018

पुणे - ‘‘मी पुण्यात एमपीएससी परीक्षेचा क्‍लास लावण्यासाठी आलोय. दुपारी दोन वाजल्यापासून रांगेत उभा आहे. आता रात्रीचे दोन वाजत आले आहेत तरी प्रवेश मिळाला नाही. प्रवेश मिळायला अजून दोन तास तरी लागतील, असं वाटतंय आम्ही येरवडा जेलच्या बाहेर बसून आरोपीची वाट पाहतोय.’’ योगेश देशमुख या नांदेडहून आलेल्या तरुणाने व्यक्त केलेली ही भावना.

पुणे - ‘‘मी पुण्यात एमपीएससी परीक्षेचा क्‍लास लावण्यासाठी आलोय. दुपारी दोन वाजल्यापासून रांगेत उभा आहे. आता रात्रीचे दोन वाजत आले आहेत तरी प्रवेश मिळाला नाही. प्रवेश मिळायला अजून दोन तास तरी लागतील, असं वाटतंय आम्ही येरवडा जेलच्या बाहेर बसून आरोपीची वाट पाहतोय.’’ योगेश देशमुख या नांदेडहून आलेल्या तरुणाने व्यक्त केलेली ही भावना.

बाजीराव रस्त्यावरील एका खासगी क्‍लासमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी शेकडो विद्यार्थी रात्रभर पदपथावर उभे होते. सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती. यातील शेकडो जणांना प्रवेश मिळाला नाही. पोटाला भाकर नाही, प्यायला पाणी नाही. अशा परिस्थितीत रात्रभर बाजीराव रस्त्याच्या पदपथावर झोपेला आवर घालून डोळे चोळत उभे राहिलेले हे विद्यार्थी. नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी भागांतून पुण्यात एमपीएससी परीक्षेच्या क्‍लासमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आले होते. काही जणांचे पालकही रात्रभर उभे होते. अनेक विद्यार्थी पदपथावरच झोपले होते.  

इंदापूरवरून आलेला शुभम शेवाळे म्हणाला, ‘‘दुपारी एक वाजता आलोय; पण आताच आतमध्ये सोडले आहे. वेटिंग लिस्टमध्ये नंबर आहे. प्रवेश अजून नक्की झालेला नाही. या क्‍लासमध्ये चांगले शिकवले जाते असे मित्रांनी सांगितले होते म्हणून इथे आलोय. आमच्या भागातील अनेक विद्यार्थी पुण्यात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत आहेत.’’ 

रात्री नऊ वाजल्यापासून रांगेत बसलोय. अजून नंबर आला नाही. दुपारपासून काही खाल्लेले नाही. या क्‍लासवाल्यांनी चहा आणि बिस्किटे दिली होती. त्याच्यावरच आजची रात्र काढायला लागणार आहे, असे बीडहून आलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले.

विदर्भ-मराठवाड्यातील विद्यार्थी जास्त
पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विदर्भ-मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. यातील बरेचसे विद्यार्थी अभियांत्रिकी, विज्ञान, कॉम्प्युटर सायन्समधील पदवी मिळविलेले आहेत. परंतु, रोजगाराची संधीच उपलब्ध नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडावा लागत असल्याचे अनेकांनी सांगितले.

क्‍लासची फी ५० हजार
या क्‍लासची अकरा महिन्यांची फी ५० हजार आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, २५० ते ३०० विद्यार्थ्यांची एक बॅच असणार आहे. अशा एकूण तीन बॅचेस म्हणजे ७५० ते ९०० विद्यार्थ्यांना क्‍लासमध्ये प्रवेश मिळणार आहे.

गावागावात क्लास
केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता गावागावांतही आता स्पर्धा परीक्षांच्या क्‍लासचे जाळे पसरले आहे. या परीक्षांसाठी एक विद्यार्थी किमान चार वर्षांचा वेळ देत असतो. कारण त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय सरकारने शिल्लक ठेवलेला नाही, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

Web Title: line for MPSC Class