एक लिंगायत, कोट लिंगायत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

या आहेत मागण्या...

  • कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला त्वरित प्रस्ताव पाठवावा
  • लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा जाहीर करावा
  • आगामी जनगणनेत लिंगायत धर्माच्या 
  • लोकसंख्येची स्वतंत्र नोंद करावी
  • कन्नड भाषेतील वचनसाहित्य मराठीसह इतर भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी स्वतंत्र मंडळाची निर्मिती करावी
  • राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे

पुणे - लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने रविवारी विभागीय आयुक्तालयावर महामोर्चा काढण्यात आला. ‘भारत देशा, जय बसवेशा’; ‘एक लिंगायत, कोट लिंगायत’ अशा घोषणा देत लिंगायत समाजाचे हजारो महिला आणि पुरुष महामोर्चात सहभागी झाले होते.

बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानातील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामोर्चा निघाला. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर, जगद्‌गुरू चन्नबस्वानंद महास्वामी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरू भालकी स्वामीजी, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर, रमेश कोरे, बसव दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बसवराज धनुर, सुधीर सिंहासने, सतीशकुमार पाटील, सदाशिव आलमखाने, बाळासाहेब होनराव, काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशातील समाजातील स्त्री-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. हातात धर्माचा झेंडा. डोक्‍यावर टोपी आणि गळ्यात भगवी मफलर घेऊन सहभागी झालेल्या समाजाच्या नागरिकांनी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. राधिका बोडके या तरुणीने समाजाच्या मागण्या मांडल्या. 

तत्पूर्वी, झालेल्या सभेत बोलताना कोरे म्हणाले, ‘‘स्वातंत्रपूर्व काळात लिंगायत हा स्वतंत्र धर्म होता. घटनेतदेखील तशी नोंद आहे. जगाला मानवतेचा आणि लोकशाहीचा संदेश बसवेश्वर महाराजांनी दिला. आमच्या मागून आलेल्या समाजाला धर्माचा आणि अल्पसंख्याकाचा दर्जा दिला गेला. आम्हाला भीक नको, आमचा अधिकार हवा आहे.’’

धनुर म्हणाले, ‘‘कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला धर्माचा आणि अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. तसाच ठराव महाराष्ट्र सरकारनेदेखील करून केंद्र सरकारकडे पाठवावा.’’

या वेळी चन्नबस्वानंद स्वामी यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lingayat Society March