भाजपची यादी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या यादीवर शहरातील नेत्यांचे सोमवारीही एकमत होऊ न शकल्याने अखेर बॉल मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी आणखी एक दिवस लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. मात्र, बुधवारपर्यंत (ता. 1) उमेदवार निश्‍चित होतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले. 

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या यादीवर शहरातील नेत्यांचे सोमवारीही एकमत होऊ न शकल्याने अखेर बॉल मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी आणखी एक दिवस लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. मात्र, बुधवारपर्यंत (ता. 1) उमेदवार निश्‍चित होतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले. 

शिवसेनेबरोबर युती होणार नाही, हे निश्‍चित झाल्यावरही भाजपच्या उमेदवारांच्या यादीला मुहूर्त लागलेला नाही. त्यासाठी तीन वेळा कार्ड कमिटीच्या बैठका झाल्या आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेली बैठक पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होती. या प्रदीर्घ बैठकीतही यादीवर एकमत झाले नाही. शहराध्यक्ष, दोन खासदार, पालकमंत्री, आमदार, राज्य आणि केंद्रातील मंत्र्यांचे निरोप यामध्ये यादी अडकली आहे. त्यामुळे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची प्राथमिक यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. त्यावर आमदार, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांना पक्षात घेतले तर, राजीनामा देण्याचा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला आहे. तसेच एका विद्यमान नगरसेवकाने प्रभाग बदलला तर, शिवसेनेत प्रवेश करण्याचे ठरविले होते. तसेच उमेदवारी कापली जाण्याची भीती असलेल्या काही विद्यमान नगरसेवकांनी "वरून' दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेही यादी लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. 

आघाडीवर ठरणार भाजपची यादी 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार की नाही, यावर भाजपचे बारकाईने लक्ष आहे. आघाडी झाली तर आणि नाही झाली तर, काही प्रभागांत भाजपने उमेदवारांचे वेगवेगळे पर्याय ठेवले आहेत. त्यामुळे आघाडीबाबत सोक्षमोक्ष झाल्यावरच पहिली यादी जाहीर करू, असे मत काही वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे. तसेच एक फेब्रुवारीपर्यंत पहिली यादी जाहीर होईल, असेही काही सूत्रांनी स्पष्ट केले. 

Web Title: List of Chief Ministers of BJP court