वाहतूक कोंडीची माहिती एका क्‍लिकवर 

file-photo-traffic
file-photo-traffic

पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमधील कोणत्याही रस्त्यावरील वाहतूक कोंडीची प्रत्येक मिनिटाची स्थिती एका क्‍लिकवर मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे पुणे वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील स्मार्ट सिटी होणार आहे. "पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' (पीएससीडीसीएल) आणि "टॉमटॉम कंपनी' यांच्यामध्ये वाहतूक व्यवस्थापन अंतर्गत "लाइव्ह ट्रॅफिक रिअल टाइम अपडेट इन्फॉर्मेशन' ऍप संदर्भात बुधवारी सामंजस्य करार झाला. 

सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या करारावेळी "पीएससीडीसीएल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त अशोक मोराळे, "टॉमटॉम कंपनी'च्या भारतातील सरव्यवस्थापक बार्बरा बेलपेयर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप म्हणाले, ""शहराची सर्वांत महत्त्वाची समस्या वाहतूक कोंडी ही आहे. पुणेकरांना प्रवास करताना सुलभतेने आणि नियोजन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करून इच्छित स्थळी पोचता यावे, यासाठी "टॉमटॉम' कंपनीच्या तांत्रिक साहाय्याने एक स्वतंत्र मोबाईल ऍप विकसित केले जाणार आहे. या ऍपमुळे शहराच्या सर्व मार्गांवरील वाहतुकीची अचूक माहिती मोबाईलवर एका क्‍लिकवर समजू शकेल. "स्मार्ट सिटी' ऍपवर ही माहिती पाहता येईल.'' 

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेर येथे प्रस्तावित मेट्रो, हायपरलूप आणि बससेवेला जोडणारा "मल्टीमोडल ट्रान्झिट हब' उभारण्यात येणार आहे. तसेच, मेट्रो, बस, चारचाकी आणि रिक्षासाठी "स्मार्ट ट्रॅव्हल कार्ड'ची सुविधा सुरू केली जाणार आहे. रस्ते, पदपथ, बसथांब्यांचे सुशोभीकरण, इलेक्‍ट्रीक बस आणि रिक्षा, सायकल, शटल बससेवा सुरू होणार आहे. इलेक्‍ट्रीक वाहनांसाठी "चार्जिंग सेंटर' उभारण्यात येणार आहे. पाचशे ई-बसच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी), मुंबई महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ई-बस, रिक्षांच्या प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात चर्चा सुरू आहे, असेही जगताप यांनी सांगितले. 

जीपीएसद्वारे संकलन सुरू 
प्रायोगिक तत्त्वावर विमानतळ आणि रेल्वे स्थानकावरील वाहतूक कोंडीच्या माहितीसंदर्भात "जीपीएस'द्वारे संकलन आणि संदेश पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या 15 मेपासून ही माहिती शहरात मोठ्या व्हीएमडी स्क्रीनवर व मोबाईलवर दाखवली जाणार आहे. www.citytomtom.com संकेतस्थळावर पुण्यासह जगातील कोणत्याही शहराच्या वाहतुकीची माहिती कळू शकणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com