आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर फुलले चैतन्य

आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर फुलले चैतन्य

पिंपरी - ‘अग्गोबाई.. ढग्गोबाई लागली कळ... ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी ना थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार...’’ या कवी आणि गीतकार संदीप खरे यांच्या बालकवितेचे बोल अंबडवेट (मोहोळनगर) येथील चिमुरड्या मुलींच्या कंठातून उमटतात. एकप्रकारे त्यांच्या डोळ्यातील आनंदच जणू बोलका होतो. 

हिंजवडीपासून साडेबारा किलोमीटरवर असलेल्या अंबडवेट (मोहोळनगर) परिसरात कातकरी समाजाची वस्ती आहे. शेतमजुरी करून गुजराण करणाऱ्यांचे प्रमाण तेथे मोठे आहे. आदिवासी समाजातील मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून वंचित राहावे लागते. सामाजिक संस्थांकडून त्यांना पोषण आहार व शैक्षणिक साहित्यांची मदत केल्याने संबंधित मुलांच्या आयुष्याला नवी दिशा सापडू लागली आहे.

मोशीतील युवा चैतन्य प्रतिष्ठानतर्फे अंबडवेट (ता. मुळशी) आणि डोंगर वस्ती (ता. पौंड) येथे काही वर्षांपासून सामाजिक संस्थांच्या मदतीने पोषण आहार आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला जातो. यंदाही प्रतिष्ठानतर्फे अंबडवेट येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार, दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश म्हसाये, प्रा. तुकाराम पाटील, ॲड. हर्षद नढे-पाटील, सीएमईचे ऑनररी लेफ्टनंट सुनील डोबाळे उपस्थित होते. त्याशिवाय संकल्प परिवार आणि मन:शक्ती प्रयोग केंद्र यांनी कातकरी वस्तीत आरोग्य तपासणी शिबिर घेतले, तसेच मुलांना पोषण आहाराचे वितरण केले.

अंबडवेट, मोहोळनगर, सुतारवाडी, गडदवणे, गडशिंदेवाडी येथील अंगणवाड्यांसाठी कंपन्या व खासगी संस्थांच्या सहभागातून वर्षभरात विविध उपक्रम राबविल्याने मुलांना पोषण आहार, शैक्षणिक साहित्य उपलब्ध होते. मुलांना कसा आहार द्यायला हवा, याबाबत पाल्यांना मार्गदर्शन करतो, असे अंबडवेट येथील अंगणवाडी सेविका निर्मला ढमाले यांनी सांगितले. 

अंबडवेट (ता. मुळशी) आणि डोंगरवस्ती (ता. पौंड) येथे २०११ पासून कातकरी समाजाच्या मुलांसाठी पोषण आहार उपक्रम राबवीत आहे. अंबडवेटमधील ३ मुले पोषण आहारामुळे कुपोषणातून बाहेर पडली आहेत.
- नीलेश म्हसाये,  अध्यक्ष, युवा चैतन्य प्रतिष्ठान

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक संस्थांतर्फे घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येत आहेत. वंचितांसाठी आठवड्यातला एक दिवस दिल्याचा आनंद वेगळा आहे.
- सुनील डोबाळे,  ऑनररी लेफ्टनंट (सीएमई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com