पोलिसाकडून बुडणाऱया सात वर्षांच्या मुलाला जीवदान

नितीन बारवकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

कॉन्स्टेबल रघुनाथ हाळणोर यांचे प्रसंगावधान; रांजणगाव एमआयडीसीतील घटना

शिरूर: नऊ फूट खोल घाण पाण्याच्या डबक्‍यात पडलेल्या सातवर्षीय मुलाला रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ भीमराव हाळणोर यांनी वाचवले. हाळणोर यांच्या या कार्याचे, तत्परतेचे व धाडसाचे शिरूर तालुक्‍यातून कौतुक होत आहे.

कॉन्स्टेबल रघुनाथ हाळणोर यांचे प्रसंगावधान; रांजणगाव एमआयडीसीतील घटना

शिरूर: नऊ फूट खोल घाण पाण्याच्या डबक्‍यात पडलेल्या सातवर्षीय मुलाला रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ भीमराव हाळणोर यांनी वाचवले. हाळणोर यांच्या या कार्याचे, तत्परतेचे व धाडसाचे शिरूर तालुक्‍यातून कौतुक होत आहे.

चैतन्य जोरी (वय 7) असे वाचवलेल्या मुलाचे नाव आहे. जोरी कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील केडगाव येथील राहणारे असून, सध्या रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास आहे. चैतन्यचे वडील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत असून, आई एका खासगी कंपनीत कामाला आहे. मंगळवारी (ता. 3) दुपारी दोनच्या सुमारास चैतन्य हा इतर दोन मित्रांसमवेत डबक्‍यातील मासे पकडण्यासाठी गेला होता. या वेळी पाय घसरून तो डबक्‍यात पडला. दोघा मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरडा केला; पण जवळपास कुणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कुणीही आले नाही. त्यानंतर चैतन्याच्या सोबत असलेल्या दोघा मुलांनी समयसूचकता दाखवून जवळच असलेल्या रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. त्या वेळी ठाणे अंमलदार एस. डी. गायकवाड व मदतनीस म्हणून हाळणोर नेमणुकीस होते. गायकवाड यांनी हाळणोर यांना या मुलांसमवेत जाऊन पाहण्यास सांगितले. हाळणोर यांनी स्वतःच्या दुचाकीवरून त्या दोन्ही मुलांना घेऊन घटनास्थळ गाठले व चैतन्यला बाहेर काढून जीवदान दिले. हाळणोर यांच्या या धाडसाचे व तत्परतेचे पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी कौतुक केले.

गणवेशासह पाण्यात उतरून घेतला शोध
चैतन्य पाण्यात पूर्णपणे बुडाला होता. रघुनाथ हाळणोर यांनी मागचा पुढचा विचार न करता गणवेशासह पाण्यात उतरून त्याचा शोध घेतला. त्या वेळी चैतन्यचा हात त्यांच्या हाताला लागला. पाणी खोल असतानाही कपारींचा आधार घेत हाळणोर यांनी चैतन्यला बाहेर काढले. त्या वेळी तो बेशुद्ध झाला होता. प्राथमिक उपचारांची माहिती असल्याने त्यांनी चैतन्यचे पोट दाबून पाणी बाहेर काढले. त्यामुळे चैतन्य शुद्धीवर आला. कारेगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी ससूनला हलविण्यात आले. चैतन्यच्या प्रकृतीचा धोका टळला असून, तो शुद्धीवर आला असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगितले.

Web Title: Lives of a seven year-old child drowning by shirur police