बारामती शिक्षक सोसायटीकडून नऊ टक्के व्याजाने कर्जपुरवठा 

संतोष शेंडकर
गुरुवार, 21 जून 2018

नियमित कर्जाच्या व्याजदरात एक टक्का तर अकस्मिक कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष देविदास ढोले व उपाध्यक्ष पांडुरंग धायगुडे यांनी दिली.

सोमेश्वरनगर - बारामती तालुका शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाने अकरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच नियमित कर्जाच्या व्याजदरात एक टक्का तर अकस्मिक कर्जाच्या व्याजदरात दोन टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष देविदास ढोले व उपाध्यक्ष पांडुरंग धायगुडे यांनी दिली. या निर्णयामुळे शिक्षकांना दहा टक्के व्याजदराने नियमित कर्ज मिळणार आहे. 

बारामती शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीवेळी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी व्याजदरात कपात करणार असल्याचे आश्वासन दिले होते. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी एक वाजता बारामतीत वसंतराव पवार नाट्यगृहात होणार आहे. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने व्याजकपातीचा निर्णय घेतला आहे. संस्थेला पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून अकरा टक्के व्याजदराने कर्ज प्राप्त होते. सोसायटी शिक्षकांना त्याच व्याजदराने कर्जपुरवठा करते. संस्थेची वार्षिक उलाढाल 45 कोटी तर कर्जवाटप 39 कोटी आहे. शंभर टक्के नियमित वसुलीमुळे संस्थेस यावर्षी 2 कोटी 9 लाख रूपये नफा झाला आहे. तर भागभांडवल 17 कोटी इतके झाले आहे. त्यामुळे संस्थेला एक टक्का कपात करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे दहा लाखांपर्यंतचे नियमित कर्ज दहा टक्के व्याजदराने दिले जाणार आहे. तर पन्नास हजार रूपयांचे अकस्मिक कर्ज नऊ टक्के व्याजदराने शिक्षक घेऊ शकतात. 

संस्थेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयामुळे प्रतिमहा एक हजार रूपये व्याजात बचत होऊ शकते. तर अकस्मिक कर्जही परवडणारे केले आहे याबद्दल समाधान आहे, असे मत ज्येष्ठ सभासद ह. मा. जगताप, बाळासाहेब मारणे यांनी व्यक्त केले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Loan 9 percent interest from Baramati Teachers Society