तुम्ही जमीन घ्या; आम्ही पैसे देतो! 

shetkari1
shetkari1

जमीन खरेदीसाठी जिल्हा बॅंक देणार 25 लाखांपर्यंतचे कर्ज; अकरा टक्के व्याजदर 

पुणे : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जमीन खरेदी करण्यासाठी कमाल 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) घेतला आहे. या निर्णयाला नुकत्याच झालेल्या बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. 

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता पीककर्जाबरोबरच जमीन खरेदी कर्जाचाही लाभ मिळू शकणार आहे. अशा पद्धतीचे कर्ज देणारी पुणे ही देशातील पहिलीच जिल्हा बॅंक ठरली आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता विक्री निघालेली शेजारची जमीन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील जिल्हा बॅंकांमार्फत शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामांतील विविध पिकांसाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते. हे कर्ज तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने उपलब्ध करून देण्याचा निर्णयही देशात पहिल्यांदा पुणे जिल्हा बॅंकेने घेतला होता. त्यानुसार मागील सहा वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.याच निर्णयाच्या धरतीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी शेत जमीन खरेदीसाठी कर्ज देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. 


या निर्णयानुसार जिल्हा बॅंकेचा सभासद असलेल्या शेतकऱ्यांना 11 टक्के व्याजदराने कमाल 25लाख रुपयांचे कर्ज मिळू शकणार आहे. मात्र कर्जाची रक्कम ही संबंधित शेतकऱ्याचे एकूण वार्षिक उत्पन्न, त्याची वार्षिक हप्ता भरण्याची कुवत आदी निकषांनुसार निश्‍चित केली जाणार आहे. कर्ज घेतलेली जमीन कर्जाची परतफेड होईपर्यंत बॅंकेकडे तारण ठेवावी लागणार आहे. 


जिल्हा बॅंक नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आहे. त्यामुळेच सातत्याने शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना उपयुक्त ठरणारे निर्णय घेतले जात आहेत. शेतजमीन खरेदी कर्जाचा निर्णयही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. 
- रमेश थोरात,अध्यक्ष,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com