युरोपियन बँकेकडून  पुणे मेट्रोसाठी कर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

शहरातील मेट्रोच्या दोन मार्गांसाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंकेकडून (ईआयबी) महामेट्रोला सुमारे २०० दशलक्ष युरोचे कर्ज मिळाले आहे. याबाबतच्या करारावर दिल्लीमध्ये नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या.

पुणे - शहरातील मेट्रोच्या दोन मार्गांसाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंकेकडून (ईआयबी) महामेट्रोला सुमारे २०० दशलक्ष युरोचे कर्ज मिळाले आहे. याबाबतच्या करारावर दिल्लीमध्ये नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या. मेट्रो प्रकल्पासाठी ईआयबीकडून महामेट्रोला सुमारे ६०० दशलक्ष युरोचे कर्ज मिळणार आहे. 

केंद्र सरकारमधील सहसचिव रजतकुमार मिश्रा आणि ईआयबीतर्फे मारिया शॉ बॅरागन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पुढील आठवड्यात महामेट्रो आणि ईआयबीमध्ये करार होणार आहे. या कर्जाचा वापर पिंपरी चिंचवड- स्वारगेट मेट्रो मार्गावर शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मार्गासाठी, त्यावरील स्थानकांसाठी आणि आगारांसाठी होणार आहे. भूमिगत मार्गासाठी स्वारगेट एसटी स्थानक आणि कृषी महाविद्यालयाच्या आवारातून काम सुरू झाले आहे. येत्या दोन महिन्यांत टनेल बोअरींग मशिनद्वारे भुयार खोदण्याचे काम सुरू होणार आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ११ हजार ४२० कोटींच्या निधीची आवश्‍यकता आहे. त्यातील ५ हजार ८३१ कोटी रुपये कर्ज स्वरूपातील आहे. आईआयबी आणि एएफडी (फ्रान्स) कडून हा कर्ज पुरवठा होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan for Pune Metro from European Bank