हवाईदलाने बंद केली लोहगावची सांडपाणी वाहिनी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

...ही समस्या हवाईदलाने दोन वर्षांपूर्वी लोहगाव ग्रामपंचायतीला कळवली होती. परंतु ग्रामपंचायतकडे निधीची कमतरता असल्याने उघड्यावरील सांडपाणी बंदिस्त वाहिणीतून नेण्याचे काम होऊ शकले नाही. 

वडगाव शेरी - वर्षानुवर्षे लोहगावचे सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी हवाईदलाने सिमेंट ओतून अचानक बंद केली आहे. त्यामुळे लोहगावमधील सांडपाणी व्यवस्था कोलमडली आहे. मुख्य चौकासह बस थांबा आणि पुण्याकडे येणारा मुख्य रस्ता मैला मिश्रित सांडपाण्यात बुडाला आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सांडपाणी जाऊ देण्याची पुणे महापालिका अधिकाऱ्यांची विनंती हवाईदलाने फेटाळ्याने हा प्रश्न अधिक जटील बनला आहे. यासाठी आता पालिका आयुक्तांनी तातडीने पाऊले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

लोहगावातील सांडपाणी वहिनी बसथांब्याच्या मुख्य चौकातून पुढे हवाई दलाच्या हद्दीत जात होती. तेथून पुढे सांडपाणी उघड्या वरून नाल्याला जाऊन मिळत होते. परंतु त्याच्या दुर्गंधीचा त्रास हवाईदल कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारतींना होत होता. ही समस्या हवाईदलाने दोन वर्षांपूर्वी लोहगाव ग्रामपंचायतीला कळवली होती. परंतु ग्रामपंचायतकडे निधीची कमतरता असल्याने उघड्यावरील सांडपाणी बंदिस्त वाहिणीतून नेण्याचे काम होऊ शकले नाही. 

त्यामुळे हवाईदलाने ही समस्या वरिष्ठ कार्यालयाकडे कळवली होती. वरिष्ठ कार्यालयातून आदेश आल्यानंतर आठवड्यापूर्वी हवाईदल अधिकाऱ्यांनी सिमेंट ओतून त्यांच्या हद्दीतील सांडपाणी वाहिनीचे तोंड बंद केले. परिणामी लोहागावातून येणारे सांडपाणी गेले सप्ताहापासून चौकात जमले आहे. बसथांबा, धानोरी आणि पुण्याकडे जाणारा रस्ता, चौक सांडपाण्यात बुडाले आहे.

पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग हवाईदलाच्या भिंतीमुळे अगोदरच बंद झाला आहे. परिणामी पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून जायला पर्यायी व्यवस्था सध्यातरी उपलब्ध नाही. 

यातून मार्ग काढण्यासाठी काल स्थानिक नागरिकांसह पालिकेचे कनिष्ठ अभियंता संतोष गायकवाड यांनी हवाईदल अधिकाऱ्यांशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. आमच्या हद्दीतून सांडपाणी वाहिनी जाऊ देणार नाही. पालिकेने पर्यायी व्यावस्था करावी अशी ताठर भूमिका हवाईदलाने घेतली आहे. पर्यायी व्यवस्था उभारण्याला कमीतकमी सहा महिने लागू शकतात. सांडपाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने सध्यातरी पालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता संतोष गायकवाड म्हणाले, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आज पालिकेचे सांडपाणी विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी आणि हवाईदलाचे अधिकारी यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Lohagaon sewage channel closed by Air force