प्रवेश शुल्काचा मुद्दा दिल्लीकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

  • मुख्य इमारतीसमोर पार्किंगचे शुल्क ८५ रुपयांवरून ३० मिनिटांसाठी आता ३० रुपये 
  • पिकअप एरियामध्ये ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांना ३४० रुपये दंड
  • कोंडी कमी करण्यासाठीच व्यावसायिक वापराच्या वाहनांना ५० रुपये प्रवेश शुल्क 
  • ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांसाठी काळजी घेतो

पुणे - विमानतळावर प्रवेश करताना कॅब किंवा बस तसेच व्यावसायिक वापराच्या वाहनचालकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याची उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी लोहगाव विमानतळ प्रशासनाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविली आहे. विमानतळावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच हे शुल्क आकारण्यात येत असल्याचे विमानतळ प्रशासनाचे म्हणणे आहे.

विमानतळावर प्रवासी वाहनांकडून प्रत्येकी पन्नास रुपये पिकअप आणि ड्रॉपसाठी शुल्क आकारले जाते. त्याबद्दल कॅबचालक, व्यावसायिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत डॉ. धेंडे यांनी लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांची भेट घेऊन हे शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, याबाबत पत्रव्यवहारही केला आहे. त्याला उत्तर देताना लोहगाव विमानतळाचे वाणिज्य उपव्यवस्थापक महेशकुमार यांनी म्हटले आहे की, ‘विमानतळावर गेल्या तीन वर्षांपासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. 

विमानतळाकडे सध्या २६ एकर जागा आहे. परंतु, प्रवाशांची आणि विमानांची संख्या वाढत आहे. तुलनेत विमानतळाच्या विस्तारीकरणाला जागा उपलब्ध झालेली नाही. जागा मिळावी म्हणून प्रशासनाने राज्य सरकार आणि महापालिकेकडे मागणी केली आहे. परंतु, अद्याप त्याबाबत प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध जागेतूनच विमानतळाचे कामकाज सुरू आहे. तरीही, प्रवेश शुल्क रद्द करण्याचा आपला प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दिल्ली कार्यालयाकडे सादर केला जाईल.’

विमानतळावरील प्रवेश शुल्क रद्द करणे गरजेचे आहे. कारण, त्याचा भुर्दंड थेट प्रवाशांना बसतो. खासदार गिरीश बापट लोहगाव विमानतळ प्राधिकरणाचे पदसिद्ध प्रमुख आहेत. त्यांनी याबाबत तातडीने पुण्यात बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येईल.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lohegaon Airport Entry Fee Issue