आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी फिरविली पुण्याकडे पाठ

Plane
Plane

पुणे - शहरातील लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार गेल्या दोन वर्षांपासून रखडल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पुण्याकडे पाठ फिरविली आहे. धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी हवाई दल तयार आहे. परंतु महापालिकेकडील प्रक्रिया रखडली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय नकाशावर पोचूनही पुण्यासाठी ‘कनेक्‍टिव्हिटी’ शोधण्याची प्रवाशांवर वेळ आली आहे. 

लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी लोहगाव विमानतळ ते ५०९ चौक दरम्यानच्या रस्त्याला पर्यायी रस्ता निर्माण करावा लागणार आहे. हा रस्ता उपलब्ध करून द्यावा, म्हणून हवाई दलाने महापालिकेच्या पथ विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. धावपट्टी पुरेशा लांबीची नसल्यामुळे बोइंग, एअरबस यांसारखी मोठ्या आकाराची विमाने पुण्यात येऊ शकत नाहीत. या विमानांद्वारे लांब पल्ल्याची सेवा पुरविली जाते. पुण्यातून ‘लुफ्तांसा’ एअर लाइन्सने फ्रॅंकफर्टसाठी विमानसेवा सुरू केली होती, तिला प्रतिसाद चांगला होता; परंतु धावपट्टीच्या मर्यादेमुळे लुफ्तांसानेही वाहतूक बंद केली आहे. अनेक विमान कंपन्या पुण्याकडे येण्यास इच्छूक आहेत. परंतु, धावपट्टीच्या समस्येमुळे त्यांनी पुण्याकडे पाठ फिरविली आहे. याबाबत विमानतळाचे संचालक अजयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘धावपट्टीचा विस्तार प्रलंबित आहे. याबाबत आता विमानतळ विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल. त्यासाठी सुमारे दोन वर्षे लागतील. धावपट्टीचा विस्तार होणे आवश्‍यक आहेच.’

इंटरनॅशनल कनेक्‍टिव्हिटी नसल्यामुळे केवळ पुणे शहराचे नाही, तर पुणे विभागाचे नुकसान होत आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोच. परंतु बाहेरून पुण्यात येणाऱ्या गुंतवणूकदारांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुण्यासारखा विस्तार असणाऱ्या अनेक शहरांना इंटरनॅशनल कनेक्‍टिव्हिटी आहे. परंतु पुणे तेवढ्याच एका बाबतीत उणे आहे. 
- प्रशांत गिरबाने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अँड ॲग्रिकल्चर

धावपट्टी पुरेशी लांब नसल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कंपन्या पुण्याकडे पाठ फिरवत आहेत. युरोपमधील अनेक देश, तसेच अमेरिकेसाठी पुण्यातून दररोज फ्लाइट सुटू शकतात. तसेच धावपट्टीचा विस्तार हा काही फारसा अवघड विषय नाही. महापालिकेच्या अखत्यारीत तो मार्गी लागू शकतो.  
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक विश्‍लेषक

अमेरिकेतील डेट्रॉइटमधून मला पुण्यात वर्षातून किमान एकदा तरी यावे लागते. मुंबईतून प्रवास करण्याऐवजी पुण्यातून आम्हाला थेट फ्लाइट मिळाली, तर खूप सोयीचे होईल.   
- केदार देशमुख, प्रवासी, संगणक अभियंता

युरोप, अमेरिकेसाठी पुण्यातून कनेक्‍टिव्हिटीची खूप गरज आहे. पुण्यातून थेट सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल. धावपट्टीचा विस्तार झाल्यास प्रवासी आणि कंपन्यांनाही फायदा होईल.  
- नीलेश भन्साळी, ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com