तीन एरोब्रिजचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

प्रवासी म्हणतात...
अभिमन्यू मल्होत्रा - मला दर सहा महिन्यांनी दिल्लीला जावे लागते. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुसळधार पाऊस होता. दिल्लीला जाण्यासाठी विमानात जायचे होते. विमान कंपनीच्या प्रतिनिधींकडे छत्री नव्हती. त्यामुळे भिजतच मला विमानात बसावे लागले होते. आता तीन एरोब्रिज होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.

कोची सुकन्या - विमानतळावर एरोब्रिज गरजेचे आहेत. लोहगाव विमानतळावर त्यांची संख्या यापूर्वीच वाढणे गरजेचे होते. विमान प्रवास ही आता गरज झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना देशांतर्गत प्रवासाठीही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळायला पाहिजेत.

पुणे - कडक ऊन किंवा जोराचा पाऊस सुरू आहे अन्‌ प्रवाशांना विमानतळाच्या आवारातून धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात जायचेय... विमान कंपनीकडे पुरेशा छत्र्या नाहीत... अशा परिस्थितीत विमानात जायचे कसे... हा प्रश्‍न आता लोहगाव विमानतळावर उपस्थित होणार नाही. कारण, तीन नव्या एरोब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दहा जूनपर्यंत ते कार्यान्वित होणार आहेत.

विमानतळाच्या आवारातून धावपट्टीवरील विमानात जाण्यासाठी जगभर एरोब्रिज आहेत. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई आदी विमानतळांवरही एरोब्रिज आहेत. लोहगाव विमानतळावर पहिल्या मजल्यावरून विमानात पोचण्यासाठी यापूर्वी दोन एरोब्रिज उभारण्यात आले आहेत. आता विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहेत. त्या अंतर्गत तीन एरोब्रिज उभारले जात आहेत. एरोब्रिजसाठी प्रवाशांकडून मागणी होत असल्यामुळे त्यासाठी लोहगाव विमानतळ प्रशासन गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यास अखेर यश आले आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली. 

विमानात प्रवेश करण्यासाठी, तसेच विमानातून उतरून सुरक्षितरीत्या विमानतळावर पोचण्यासाठी एरोब्रिजचा उपयोग होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या कामाला मंजुरी दिली असून, त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोहगाव विमानतळावरून 
रोजची विमान वाहतूक - १५० 
प्रवाशांची रोजची ये-जा - २२ हजार 
विमान कंपन्यांची संख्या -  १२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lohgaon Airport Aerobridge work