Pune Lok Sabha Bypoll : पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक होणारच, तयारी पूर्ण? 'हे' उमेदवार चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Lok Sabha Bypoll

Pune Lok Sabha Bypoll : पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक होणारच, तयारी पूर्ण? 'हे' उमेदवार चर्चेत

Pune Lok Sabha Bypoll :   दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.  पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. पुणे निवडणूक विभागाने याबाबत संपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे तातडीने निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून १७ दिवसांआधी तयारी सुरू आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्र निश्चितीची कामं पूर्ण करण्यात आली आहेत. कर्नाटकातून चार हजार २२० ईव्हीएम, पाच  हजार ७०० व्हीव्हीपॅट पुण्यात दाखल झाले आहेत. ३०० इंजिनीअर्सची नियुक्ती तसेच मशिनवर पुणे पोटनिवडणूक अशा उल्लेखाचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.  

३० मे रोजी तयारी पूर्ण झाल्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठण्यात येणार आहे. अहवाल मिळाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग पोटनिवडणूक जाहीर करु शकते, अशी माहिती मिळाली आहे.

पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचे निधन (ता. २९ मार्च २०२३ रोजी) झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. पुढील वर्षी म्हणजे एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांसाठी पुणे लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती.

हे उमेदवार चर्चेत -

पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकरांना या निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेसची आहे. तर भाजपकडून स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

पक्षांची गणित -

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत अनुक्रमे अनिल शिरोळे, गिरीश बापट यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला खेचून आणला. कसबा येथे मविआच्या झालेल्या विजयाने पुणे लोकसभा निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. काँग्रेसकडून निवजणूक लडवण्यासाठी मोहन जोशी, रवींद्र धंगरेकर आणि अरविंद शिंदे यांची नावं आघाडीवर आहेत.  

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे, गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

पुणे लोकसभा क्षेत्रात विधानसभेच्या सहापैकी चार ठिकाणी भाजप, तर काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा विधानसभा मतदारसंघात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारांची एकूण मतदारसंख्या सुमारे १९ लाख ७२ हजार इतकी आहे.