लोकसभेप्रमाणेच विधानसभेस सुध्दा सन्मानपुर्वक आघाडी असणे गरजेचे : पृथ्वीराज चव्हाण

chavan
chavan

इंदापूर : ''लोकसभा निवडणूकीत प्रत्येकवेळी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूकीत मित्रपक्षाने आमच्या छातड्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेस सुध्दा सन्मानपुर्वक आघाडी असणे गरजेचे आहे. देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या जेष्ठ नेत्याने लोकसभेबरोबरच काही ठिकाणी विधानसभेचा देखील सुस्पष्ट निर्णय घेणे गरजेचे आहे. मात्र तसे न झाल्यास आम्हास देखील गृहीत धरू नये.'' ,असा सुचक इषारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता दिला. त्यामुळे आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.
 
इंदापूर तालुका काँग्रेसच्यावतीने नगरपरिषद प्रांगणात आयोजित जाहिर सभेत चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील होते. यावेळी  पाटील, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव, पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, काँग्रेस गटनेते कैलास कदम यांच्या भाषणाची दखल घेवून चव्हाण यांनी हा इशारा दिला.
''आघाडीमध्ये काँग्रेसच्या इंदापूर, पुरंदर या पारंपारिक विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची जाहिर वाच्यता करूनच आघाडी करणे गरजेचे असून मित्रपक्षाने देखील आघाडीचा धर्म पाळला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत सन २०१४ च्या निवडणूकीत मतदारांनी केलेली चूक सुधारून हर्षवर्धन पाटील यांना विजयी करावे असे आवाहन चव्हाण यांनी केले. 

चव्हाण पुढे म्हणाले, मागील लोकसभा निवडणूकीत ६३ टक्के मते विरोधात असताना केवळ ३१ टक्के मते मिळालेला भाजपा मतांचे विभाजन झाल्यामुळे केंद्रात सत्तेवर आला. त्यामुळे जातीयवादी सरकारची सत्तेवरून हकालपट्टी करून धर्मनिरपेक्ष समविचारी बहुजनांचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी आघाडीकरण्याचे पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांचे धोरण आहे. त्यामुळे आम्ही आघाडीच्या माध्यमातून चांगल्या उमेदवारांचा शोध घेत आहोत, काही ठिकाणी अदलाबदली करतोय. काही समविचारी पक्षांना जागा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकास एक उमेदवार देवून मत विभागणी टाळून भाजपाचे खासदार कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघास काहीही झाले तरी, धक्का पोहचू देणार नाही. राफेल विमान घोटाळा प्रकरणी न्यायालयाने निकालाबाबत पुर्नअवलोकनाची भुमिका घेतली आहे. शेतकऱ्य़ांना हमीभाव नाही. दुध धंदा उध्वस्त झाला आहे. युवकांना रोजगार नाही. त्यामुळे काही उद्योजकांचे हित जपणाऱ्या या सरकारला सत्तेवरून घालवणे गरजेचे आहे.
 
हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकसभा निवडणूकीसाठी आघाडीचे वारे असून तालुक्यात आम्हास भाजपा शिवसेनेचा त्रास नाही, मात्र तालुक्यात आमच्यावर टिका सुरू आहे. आघाडी करणाऱ्या मित्र पक्षामुळेच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास त्रास होत असून आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे काँग्रेसची ताकद जोपासण्यासाठी आघाडी करताना ही बाब पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्यापर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांनी पोहोचवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सुत्रसंचलन रघुनाथ पन्हाळकर तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष बापू जामदार यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com