Loksabha 2019 : मतदान यंत्रणा लागली कामाला

Loksabha 2019 :  मतदान यंत्रणा लागली कामाला

पिंपरी -  एकीकडे मतदान यंत्रांची तपासणी; तर दुसरीकडे निवडणूक विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदान केंद्र अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवमतदार नोंदणी, दुबार नावे वगळण्याचे काम मतदार नोंदणी विभागात सुरू आहे. असे चित्र निवडणूक विभागाच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये दिसून आले. 

नवनगर विकास प्राधिकरणाच्या निगडी-प्राधिकरणातील इमारतीत मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने मध्यवर्ती कार्यालय सुरू केले आहे. त्याअंतर्गत मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण व पनवेल या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूकविषयक कामे सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आदी विभागांतील वेगवेगळे अधिकारी व कर्मचारी वर्ग करण्याचे काम सुरू आहे. 

त्यांना जबाबदारीचे वाटप व कामांबाबतची माहिती समजावून सांगितली जात आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याला गैरहजर राहिलेल्यांना अगोदर कारणे  दाखवा नोटीस देऊन कार्यमुक्त केले जात आहे. 

मावळ मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रविवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाले. त्याला अनुपस्थित राहिलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची व वेगवेगळ्या विभागांतून निवडणूक विभागात तात्पुरत्या स्वरूपात वर्ग केलेल्यांना कामाचे वाटप करण्याची लगबग सोमवारी मावळ लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बघायला मिळाली. 

दरम्यान, भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतदान यंत्रांची (ईव्हीएम) तपासणी (फिजिकल इन्स्पेक्‍शन) सुरू आहे. त्यात उमेदवारांची यादी असलेले यंत्र (बॅलेट युनिट), मतदान केंद्रप्रमुखाकडील नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि मतदार सत्यता पडताळणी यंत्र (वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रायल) यांची तपासणी केली जात आहे. तपासणी झाल्यानंतर मतदान केंद्रांनुसार मतदान यंत्रे पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी यंत्रांची निवड किंवा अनियतीकरण (रॅंडमायझेशन) केले जाणार आहे. त्यानंतर यंत्र मतदान केंद्रांवर पोचविण्यात येणार आहेत. 

बालेवाडीत मतमोजणी
नवनगर विकास प्राधिकरण इमारतीच्या सातव्या मजल्यावर मावळ लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये होणार आहे, असे निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नवमतदार साडेतीन लाखांवर
मावळ लोकसभा मतदारसंघात २२ लाख २७ हजार १३३ मतदार आहेत. त्यात १८ ते २० वयोगटांतील मतदारांची संख्या साडेतीन लाखांवर आहे. ते प्रथमच मतदान करणार आहेत. नवीन मतदारांची नावनोंदणी अद्याप सुरू असल्याने नवमतदारांची संख्या आणखी वाढू शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com