Loksabha 2019 : लोकसभेतील विजयावरच पक्षाचे अस्तित्व

अविनाश म्हाकवेकर
बुधवार, 22 मे 2019

असा आहे राजकीय पट

  • पुन्हा वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेस
  • आमदारसंख्या तीनवरून सहा करण्याची भाजपची मनीषा
  • शिवसेना बळकट करण्याचे संघटनात्मक आव्हान

पाच वर्षांत हातातून गेलेली बहुतांश सत्ताकेंद्रे व नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कमकुवत झाली. शिवसेनेचा हवा तसा विस्तार झाला नाही. त्यामुळेच, दोन्हीही पक्षांना विजय गरजेचा आहे; अन्यथा भविष्यात  मोठी किंमत मोजावी लागू शकते. शेकापचीही अशीच स्थिती आहे.

चिंचवडवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची पकड आहे. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे काही नावे आहेत. मात्र, पार्थ पवार यांना मतदारसंघातून किती मतदान होते, यावर भवितव्य असेल. युती अभंग राहिली, तर जागावाटपामुळे शिवसेनेला जगताप यांचा प्रचार करणे भाग आहे. युती तुटलीच, तर विद्यमान अथवा माजी खासदार, असे कोणतेही बिरूद लागले; तरी श्रीरंग बारणे यांना पक्षसंघटनेची ताकद दाखवावीच लागेल.

पिंपरीत शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार आमदार आहेत. मात्र, त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे सांगता येत नाही. इच्छुकांपैकी फारसे ताकदवान दिसत नाहीत. हीच बाब हेरून भाजपने मतदारसंघावर आतापासूनच दावा केलाय. कदाचित, रिपब्लिकन पक्षालाही बळ मिळेल. राष्ट्रवादीचा पहिला आमदार होता, तर दुसऱ्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते होती. मावळवर २५ वर्षे भाजपचे वर्चस्व आहे. बाळा भेगडे तिसऱ्यांदा आमदारकीसाठी प्रयत्नशील आहेत. लोकसभेच्या निमित्ताने कधी नव्हे इतकी एकजूट राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसली. पार्थ यांचा विजय झाला, तर इच्छुकांची संख्या वाढेल आणि उमेदवारी कोणाला, असा पेच निर्माण होईल.

कर्जतचे आमदार सुरेश लाड राष्ट्रवादीचे असून, त्यांच्याविषयी शेकाप, काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यातूनच पार्थ यांना शेकापने पुरस्कृत केले होते. त्यामुळे मतदारसंघावर शेकाप दावा करू शकतो. तशी तयारी आमदार जयंत पाटील यांच्या घरातूनच आहे. बंडखोरीमुळे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार तीनदा पराभूत झालाय. युती धर्मात भाजपला जिल्ह्यात समान वाटा हवाय. त्यामुळे शिवसेनेला मतदारसंघावर पाणी सोडावे लागेल. उरणमध्ये शिवसेना आमदार मनोहर भोईर यांच्याविषयी नाराजी असली तरी पर्यायही नाही.

मागील निवडणुकीत भाजपच्या महेश बालदींना तिसऱ्या क्रमांकाची मते होती. प्रसंगी त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळू शकते. शेकापकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने माजी आमदार विवेक पाटलांना पुन्हा संधीची शक्‍यता आहे. शेकापचे जयंत पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभेसाठी सक्रिय होण्याची शक्‍यता कमी आहे. पनवेलवर भाजप आमदार प्रशांत ठाकूरांचे एकहाती वर्चस्व आहे. लोकसभेचा निकाल काहीही लागला, तरी भाजपवर परिणाम होणार नाही, ठाकूर हेच उमेदवार असतील. याउलट एकेकाळी प्राबल्य असलेल्या शेकापला हार पत्करावी लागत आहे.

असे आहेत इच्छुक
भाजप -
 लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, देवेंद्र साटम, सुनील शेळके, रवींद्र भेगडे, अमित गोरखे, सीमा सावळे, महेश बालदी.

शिवसेना - गौतम चाबुकस्वार, मनोहर भोईर, राहुल कलाटे, गजानन चिंचवडे, रामदास शेवाळे, महेंद्र थोरवे, सुरेश टोकरे, संतोष भोईर. 

राष्ट्रवादी - सुरेश लाड, अण्णा बनसोडे, संजोग वाघेरे, नाना काटे, बापूसाहेब भेगडे, बाळासाहेब नेवाळे, प्रशांत पाटील, सुनील घरत, देवेंद्र मसूरकर. 

काँग्रेस - महेंद्र घरत, आर. सी. घरत, माऊली दाभाडे.

शेकाप - विवेकानंद पाटील, प्रीतम म्हात्रे, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील.

आरपीआय - चंद्रकांता सोनकांबळे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Maval Constituency Shivsena BJP NCP Politics