Loksabha 2019 : प्रचारात खादीची क्रेझ कायमच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामुळे खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी उमेदवार, युवा कार्यकर्ते गर्दी करताना दिसून येत आहेत. विशेषतः निवडणूक लक्षात घेता उमेदवार, कार्यकर्ते विविध रंगांच्या नेहरू शर्टला पसंती देत आहेत.

पिंपरी - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामुळे खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी उमेदवार, युवा कार्यकर्ते गर्दी करताना दिसून येत आहेत. विशेषतः निवडणूक लक्षात घेता उमेदवार, कार्यकर्ते विविध रंगांच्या नेहरू शर्टला पसंती देत आहेत. 

डिजिटल युगात निवडणुकीचे तंत्र बदलले असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून खादीची क्रेझ तरुणांमध्ये अद्यापही कायम आहे. खादीमध्ये अंबर खादी, गांधी खादी, बंगाल खादी, पांढरा शुभ्र खादीचा झब्बा-पायजमा, शर्ट-ट्राउझरची मागणी आहे. ३०० ते ८०० रुपये मीटर कापड, तर नेहरू शर्ट ८८५, ट्राउझर ७५० रुपयांना आहे. युवा कार्यकर्त्यांमध्ये नेहरू शर्ट, जॅकेटची विशेष क्रेझ आहे. 

प्रचारात राजकीय नेते, पुढारी, कार्यकर्ते पांढऱ्या रंगाच्या खादीला अधिक पसंती देत असल्याचे पिंपरीतील ओम साई नित्यानंद खादी ग्रामोद्योग भांडाराचे सिद्धार्थ जन्नू यांनी सांगितले. 

कापडामध्ये ५८ पन्ना उपलब्ध असून, ३८० रुपये ते ९४० रुपये मीटर त्याचा भाव आहे. रेशम कपडा महाग असूनही महिलांची त्याला खास पसंती असल्याने ११३० रुपयांपासून ते १८०० रुपयांपर्यंत मीटर कपडा बाजारात उपलब्ध आहे. 

खादीचा नेहरू शर्ट, कॉटनची पूना पॅंट हा नेत्याचा खास पोशाख आहे. निवडणुकीमुळे खादीचे कापड घेऊन पोशाख शिवून घेण्यासाठी विविध पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांचा कल वाढला असून, शिंप्याकडे गर्दी वाढली आहे. तर तरुणाई विशेषत: रंगीत खादी कपड्यांना पसंती देत असल्याने खादी ग्रामोद्योगसह गडद शेडमध्ये केशरी, पांढरा, निळा, लाल रंगाच्या कापड खरेदीसाठी दुकानात गर्दी दिसून येत आहे.

उन्हामुळे खादीला पसंती 
सध्या उन्हाचाही पारा वाढत आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे. खादीचे कपडे घातल्याने उन्हापासून बचाव होतो. त्यामुळे बाजारात नामांकित खादीच्या कपड्यांना, पांढऱ्या रंगाच्या कपड्याला मागणी वाढली आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Publicity Khadi Craze Politics