निवडणूक खर्च वेळेत सादर करा - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

स्टार प्रचारकांच्या प्रवास खर्चाला सूट
राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या (कॅम्पेनर) यादीतील नेत्यांच्या प्रवासावरील खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यातून सूट देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित सर्व खर्चाचा समावेश उमेदवारांनी निवडणूक खर्चात करावा, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

पुणे - ‘उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च केला असल्यास तो खर्चात दाखवावा. तसेच, प्रचारादरम्यान होणारा खर्च वेळेवर सादर करावा,’’ अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. निवडणूक आयोगाच्या सूचना, आदर्श आचार संहिता आणि इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन याबाबत या वेळी माहिती देण्यात आली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजीव श्रीवास्तव, रजत अग्रवाल, केंद्रीय खर्च निरीक्षक प्रियंका गुलाटी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, निवडणूक खर्च व्यवस्थापनचे अजित रेळेकर, एक खिडकी योजनेचे सुहास मापारी, ईव्हीएम व्यवस्थापनचे विजयसिंह देशमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘‘उमेदवारांकडून निवडणुकीदरम्यान वेळोवेळी विविध प्रकारच्या परवानग्या, परवाने घेतले जातात. त्या अनुषंगाने रॅली, मेळावे, रेडिओ प्रक्षेपण, व्हिडिओ चित्रीकरण, दूरदर्शन प्रक्षेपण, पथनाट्य, मोबाईलवरील एसएमएस आणि सोशल मीडियाद्वारे प्रचारयंत्रणा राबविली जाते. मात्र काही उमेदवारांकडून निवडणूक कार्यालयाला खर्चाची माहिती दिली जात नाही. त्यामुळे हिशेबात चूक होऊन तफावत निर्माण होते. त्यामुळे परवानगी घेतल्यांनतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सर्व खर्च सविस्तरपणे नोंदविणे आवश्‍यक आहे.’’ उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बाबत, तर अजित रेळेकर यांनी निवडणूक खर्चविषयक प्रश्‍नांना उत्तरे दिली.

Web Title: Loksabha Election Candidate Expenditure Collector