आजोबा कशाला? नातूच चीत करेल! - दिलीप मोहिते

Dilip-Mohite-and-Rohit-Pawar
Dilip-Mohite-and-Rohit-Pawar

राजगुरुनगर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी,’’ असे जाहीर आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले. ‘‘निष्क्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाडण्यासाठी आजोबांची गरज नाही, नातूच त्यांना चीतपट करेल,’’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आनंदी आनंद कार्यालयात युवक मेळाव्याचे आयोजन केले होते, त्या वेळी मोहिते बोलत होते. या वेळी रोहित पवार, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी खराबी, युवकचे तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, सुरेखा टोपे, संध्या जाधव, सुरेखा मोहिते, सुभाष जाधव आदी उपस्थित होते. 

दिलीप मोहिते म्हणाले, ‘‘विकासाला विरोध करणारे आणि खोटे बोलण्यात पीएच.डी. मिळवतील असे शिरूरचे खासदार आहेत. फसवायचे आणि संभ्रम निर्माण करायचा, एवढेच यांचे काम. आम्ही एखादे विकासाचे काम घेतले, की आलेच विरोधाला पुढे. यांच्यामुळे विमानतळ गेले, सेझ गेला. पंधरा वर्षांत काहीही काम झाले नाही. रेल्वेसाठी अर्थसंकल्पात रुपयाचीही तरतूद नाही आणि रेल्वे काय आकाशातून जाणार आहे का?

निष्क्रिय खासदार मतदारसंघाला लाभले. म्हणून मागच्यावेळी पवार साहेबांना या मतदारसंघाचे नेतृत्व करायची विनंती केली होती. साहेबांनी टाळले, त्यामुळे आमचे स्वप्न अपुरे राहिले. पवारांच्या ऋणातून मुक्त व्हायचे आहे, म्हणून रोहितदादांनी येथून लोकसभा लढवावी. सर्वजण मतभेद विसरून तुमच्या पाठीशी उभे राहतील.’’ 

मोहिते यांच्या आवाहनावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि रोहित पवार यांच्या झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मोहिते पुढे म्हणाले, ‘‘या मतदारसंघाला सळसळत्या तरुण रक्ताच्या नेतृत्वाची गरज आहे. मतदारसंघातील प्रमुख मंडळी पवारसाहेबांना भेटून त्यांच्याकडे तशी मागणी करणार आहोत.’’

‘आमदारांचे एमआयडीसीत ठेके’
‘‘सध्याच्या आमदारांचे आणि त्यांच्या भावांचे एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये लेबर, स्क्रॅप आणि वाहनांचे ठेके आहेत, ते सगळे बाहेर काढणार आहे. माझ्यावर गेल्यावेळी एमआयडीसीत हप्ते घेतल्याचे खोटे आरोप केले. मग चार वर्षांत यांनी सिद्ध केले नाही. मी कार्यकर्त्यांसाठी आग्रह धरायचो आणि हे कुटुंबीयांसाठी धरीत आहेत. तालुक्‍यात धरणे असताना तालुका पाण्यासाठी वणवण करतोय आणि यांनी मुक्‍याची भूमिका घेतली आहे,’’ अशी टीका मोहिते यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com