Election Results : कार्यकर्ते निर्धास्तपणे लागले बोलू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीला मात दिली.

पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीला मात दिली. या साऱ्या लढतीत अपयश आणि यशाची कारणे कोणती? प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या कोणाची कोणाला साथ लाभली? या विषयावर आता कार्यकर्ते मोकळेपणाने बोलू लागले आहेत.

...म्हणून पार्थ पडले
तरुण वर्गाला अपील होईल म्हणून पार्थ यांना दिलेली उमेदवारी कोणालाही भावली नाही. कारण ते अगदीच नवागत होते. शहरातही ते निवडणुकीच्या निमित्तानेच आले. अर्थात, त्यांच्या भोवती अजित पवारांना घेरणाऱ्यांचीच गर्दी राहिली. त्यामुळे पहिल्या भाषणावेळी उडालेल्या त्रेधातिरपिटीचीच प्रतिमा साऱ्यांसमोर शेवटपर्यंत राहिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी कमी अवधी मिळाला. तसेच मतदारसंघ विखुरलेला असल्याने सर्वच ठिकाणी धावते दौरे करावे लागले. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी निवांत बैठका घेता आल्या नाहीत. गावोगावी पोचता आले नाही. केवळ पक्ष व कार्यकर्त्यांचाच मतदारांशी संबंध आला. प्रचाराची जबाबदारी, नियोजन चांगले होते. त्यामुळे मागील दोन्ही निवडणुकींच्या तुलनेत चांगली मते मिळाली. गेल्या पाच वर्षांत हातातून गेलेल्या बहुतांश स्थानिक स्वराज संस्था, नेत्यांनी पक्षातून केलेले पलायन याचा जबर फटका बसला. मित्र पक्ष बलवान नसल्याने त्यांचा कोणताही फायदा झाला नाही. मतांसाठी पक्षाला स्वतःच्या ताकदीवरच अवलंबून राहावे लागले. पाच वर्षे नसलेली सत्ता व नेत्यांचा तुटलेला संपर्क याचाही फटका बसला.

...म्हणून बारणे जिंकले
श्रीरंग बारणे गेली तीस वर्षे राजकारणात असल्याने निवडणुकांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. साहजिकच सभा, बैठकांतील त्यांचा वावर आत्मविश्‍वासपूर्ण राहिला. उत्तम संवादकौशल्य व सर्व थरांतील कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा स्वभावही मतदारांना विशेष भावला. त्यांनी आपल्याभोवती ठराविक कार्यकर्त्यांचे कोंडाळे कधीही निर्माण होऊ दिले नाही. 

खासदारकीच्या पूर्वानुभवामुळे वाड्यावस्त्यांशी असलेला संपर्क, उमेदवारी निश्‍चित असल्याने प्रचाराला मिळालेला मोठा अवधी, वर्षभरापासून गावोगावी घेतलेल्या बैठकांचे सत्र, विकासकामांवर दिलेला भर आणि मतदारांशी असलेल्या थेट संपर्कामुळे शिवसेनेचे चांगले जाळे विणले गेले. त्यातच त्यांना भाजप कार्यकर्ते व नेत्यांची मोठी ताकद मिळाली. दोन्ही पक्षांनी नियोजनबद्धरीत्या स्वतंत्ररीत्या प्रचारयंत्रणा राबविल्याने मोठा फायदा झाला. शिवाय विरोधी उमेदवाराविषयी झालेली नकारात्मक भावनाही मताधिक्‍य मिळवून गेली. पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी म्हणूनही अधिक पसंती दिली. अजित पवारांचा शहरात पुन्हा शिरकाव नको असल्याने पार्थच्या विरोधात झालेला प्रचार फायदेशीर झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election Results Maval Constituency Activists Shrirang Barne Parth Pawar Politics