शक्तिप्रदर्शनाला ‘इव्हेंट’ची भट्टी

ज्ञानेश्‍वर वाघमारे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

वडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे. 

वडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे. 

लोकसभा निवडणुकीला पाच, तर विधानसभा निवडणुकीला दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारच्या गतिमान झालेल्या हालचाली लक्षात घेता लोकसभेबरोबरच विधानसभेची निवडणूक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुक्‍यातील राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. विशेषतः आमदारकीसाठीच्या इच्छुकांनी विविध उपक्रमांद्वारे मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी तसेच शिवसेना व भाजपची युती होणार की नाही, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

राजकीय पक्षांची लगबग
सत्ताधारी भाजपने सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचविण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी विभागवार लाभार्थी शिबिरांचे आयोजन केले गेले. सीएम चषकांतर्गत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाही झाल्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर विकासकामांची भूमिपूजनेही झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीने रिक्त नियुक्‍त्या करून संघटना बळकट करण्यावर भर दिला. रस्त्यांची दुरवस्था, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने आंदोलने केली. तर, काँग्रेसने ‘बंद’ची हाक दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीत मावळची जागा आपल्याच पक्षाला मिळावी, यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. शिवसेनेने कार्ला व लोणावळ्यात बैठका घेऊन व्यूहरचना आखण्यास सुरवात केली. खासदारकीच्या दृष्टीने मावळ मतदारसंघ महत्त्वाचा असल्याने खासदारांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागलेल्या विकासकामांचा प्रसार करण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे दिसून येत आहे.

इच्छुकांचा उपक्रमांवर भर
राजकीय पक्षांपेक्षा आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या हालचाली अधिक गतिमान झाल्याचे दिसून येत आहे. स्वखर्चातून विविध उपक्रम राबविण्यात प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक आघाडीवर आहेत. भाजपकडून आमदार बाळा भेगडे तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या पुढाकारातून विविध इव्हेंट राबविण्यात आले आहेत.

तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके व तालुका भाजयुमोचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनीही विविध उपक्रम राबवून आपण शर्यतीत असल्याची जाणीव स्वपक्षाला करून दिली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीच्या आगामी उमेदवाराबाबतही मोठी उत्सुकता आहे.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांचा वाढदिवस नुकताच थाटामाटात साजरा झाला. अभीष्टचिंतन समारंभात अनेक वक्‍त्यांनी त्यांच्या उमेदवारीचे जाहीरपणे संकेत दिले. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून पक्षसंघटेपासून अलिप्त असलेले जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या आगामी भूमिकेकडेही तालुक्‍याचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसनेही निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, पक्षात पाच जणांची निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यांची नावे अद्याप गुलदस्तात आहे. रिपब्लिकन पक्ष व मनसेच्या भूमिकेबाबतही कुतुहलाचे वातावरण आहे.

Web Title: Loksabha Vidhansabha Election Candidate Power Presentation Event Politics